रूग्णाला खाटेवर झोपवून केला नाला पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 12:14 AM2017-09-04T00:14:49+5:302017-09-04T00:15:38+5:30
१०८ क्रमांकाची रूग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली असली तरी जुव्वी गावाजवळील नाल्यावर पूल नसल्याने रूग्णवाहिका पोहोचू शकली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
भामरागड : १०८ क्रमांकाची रूग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली असली तरी जुव्वी गावाजवळील नाल्यावर पूल नसल्याने रूग्णवाहिका पोहोचू शकली नाही. त्यामुळे नागरिकांनी रविवारी रूग्णाला खाटेवर झोपवून नाला पार केला. त्यानंतर पलिकडे असलेल्या रूग्णवाहिकेत टाकून रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
भामरागड हा तालुका जंगलव्याप्त व नदी, नाल्यांनी वेढलेला आहे. अनेक नदी, नाल्यांवर पुलाचे बांधकाम झाले नाही. त्यामुळे पावसाळ्यात नदी व पुलाच्या पाण्यातूनच प्रवास करावा लागतो. केंद्र शासनाने भामरागड येथील ग्रामीण रूग्णालयाला १०८ क्रमांकाची रूग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे. सदर रूग्णवाहिका कॉल केल्यानंतर गावातच उपलब्ध करून दिली जाते. मात्र भामरागड तालुक्यातील भौगोलिक परिस्थिती अतिशय भिन्न आहे. निम्म्याहून अधिक गावापर्यंत जाण्यासाठी रस्ता नाही. जुव्ही हे गाव भामरागड तालुकास्थळापासून १७ किमी अंतरावर आहे. या गावातील एका नागरिकाची अचानक प्रकृती बिघडली. मात्र या गावाच्या जवळ असलेल्या जुव्वी नाल्यावर पूल नसल्याने रूग्णवाहिका नेणे शक्य नव्हते.
गावातील नागरिकांनी रविवारी खाटेवर रूग्णाला झोपवून जुव्वी नाल पार केला व पलिकडे असलेल्या रूग्णवाहिकेपर्यंत आणले. रूग्णवाहिकेचे डॉ. मंडल यांनी त्याच ठिकाणी संबंधित रूग्णाला सलाईन लावली व इतर उपचार केले. त्याला तत्काळ भामरागड ग्रामीण रूग्णालयात भरती केले. वेळेवर दाखल केल्याने सदर रूग्णाचे प्राण वाचले आहे.
पावसाळ्यात स्थिती गंभीर
पावसाळ्यात नदी, नाल्यांमध्ये पाणी राहत असल्याने रूग्णवाहिका तर सोडाच दुचाकी वाहनही जात नाही. त्यामुळे पावसाळ्यात कित्येक नागरिकांचा उपचाराअभावी गावातच मृत्यू होतो. पावसाळ्यात पूरादरम्यान अनेक गावांचा संपर्क तुटत असल्याने आरोग्याची समस्या गंभीर होते.