जिल्ह्यातून ‘जय विदर्भ’चा नारा गुंजणार
By admin | Published: November 13, 2014 11:01 PM2014-11-13T23:01:55+5:302014-11-13T23:01:55+5:30
महाराष्ट्रात सर्वात मागास व विकासातही सर्वात मागे असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील जनतेला आता स्वतंत्र विदर्भ राज्य हवे आहे. राज्यातील भाजपच्या सरकारमध्ये शिवसेना सहभागी झाली
ए. आर. खान - अहेरी
महाराष्ट्रात सर्वात मागास व विकासातही सर्वात मागे असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील जनतेला आता स्वतंत्र विदर्भ राज्य हवे आहे. राज्यातील भाजपच्या सरकारमध्ये शिवसेना सहभागी झाली नसल्याने दुर्गम भागातील जनतेसह जिल्ह्यातील विदर्भवादी नेत्यांना आता स्वतंत्र विदर्भ राज्य होईल, अशी मोठी आशा वाटू लागली आहे. त्यामुळेच आगामी नागपूर अधिवेशनाच्या काळात अहेरी उपविभागातून पुन्हा जय विदर्भाचा नारा गुंजण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाकडे राज्य सरकारचे कायम दुर्लक्ष झाले. या भागातील नैसर्गिक साधनसंपत्तीच्या भरवशावर हा भाग समृद्ध होऊ शकला असता, परंतु राज्य सरकारची उदासीनता याला कारणीभूत ठरली. पश्चिम महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांनी कायम विदर्भासह गडचिरोली जिल्ह्यावरही अन्याय करण्याची भूमिका घेतली. त्यामुळे नक्षलवादासारख्या गंभीर प्रश्न या भागात वाढीस लागला. सिंचनाची कोणतीही सुविधा निर्माण झाली नाही. ज्या जनतेने जंगल राखला, तोच जंगल विकासासाठी अडसर ठरला. स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण झाल्याशिवाय आपला विकास शक्य नाही, ही भावना आता गडचिरोली जिल्ह्यातील जनतेच्या मनात निर्माण झाली आहे. या भावनेतूनच गडचिरोलीसह विदर्भातून भारतीय जनता पक्षाला ४४ जागा निवडणुकीत विधानसभेत मिळाल्या.
भारतीय जनता पक्षाचा मागील २५ वर्षांपासून मित्र असलेला शिवसेना विदर्भ राज्याचा कायम विरोधक राहिला. मात्र बुधवारी झालेल्या विश्वास मत प्रस्तावानंतर शिवसेनेशी असलेले नाते पूर्णपणे संपुष्टात आले. आता भाजपला विदर्भ राज्य देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका विदर्भ राज्याबाबत अनुकूल नसली तरी पक्षातील विदर्भवादी नेते मात्र स्वतंत्र राज्यासाठी कंबर कसून आहे. नाग विदर्भ आंदोलन समितीनेही भाजपसोबत याच मागणीला घेऊन आघाडी केली आहे.
स्वत: नाविसचे केंद्रीय अध्यक्ष अम्ब्रीशराव महाराज भाजपचे आमदार आहे. त्यामुळे आगामी नागपूर अधिवेशनाच्या काळात पुन्हा स्वतंत्र विदर्भाचा नारा गडचिरोली जिल्ह्यात गुंजणार आहे, असे चित्र दिसून येत आहे.