१२ ग्रामपंचायती झाल्या ‘स्मार्ट’
By admin | Published: June 12, 2017 12:54 AM2017-06-12T00:54:05+5:302017-06-12T00:54:05+5:30
शासनातर्फे सन २०१६-१७ या वर्षाकरिता ‘स्मार्ट ग्राम’ योजना राबविण्यात आली. या योजनेत
स्मार्ट ग्राम योजना : सर्वाधिक गुण मार्कंडादेव ग्रा.पं.ला
दिलीप दहेलकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शासनातर्फे सन २०१६-१७ या वर्षाकरिता ‘स्मार्ट ग्राम’ योजना राबविण्यात आली. या योजनेत जिल्हाभरातील ५० वर ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला होता. यापैकी निकष पूर्ण करणाऱ्या जिल्ह्यातील १२ ग्रामपंचायती स्मार्ट ग्राम म्हणून जाहीर झाल्या आहेत. या ग्रामपंचायतींना विकासकामांसाठी प्रत्येकी १० लाख रूपयांचा निधी राज्य शासनाकडून मिळणार आहे.
सन २०१०-११ पासून राज्य सरकारतर्फे पर्यावरण संतुलीत समृध्द ग्राम योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेत दरवर्षी गडचिरोली जिल्ह्यातील काही निवडक ग्रामपंचायती सहभागी होत होत्या. त्यानंतर सदर योजनेच्या अंमलबजावणी व निकषात राज्य शासनाने फेरबदल केले व त्यानंतर २१ नोव्हेंबर २०१६ च्या ग्राम विकास विभागाच्या शासन निर्णयानुसार पर्यावरण संतुलीत समृध्द ग्राम योजनेचे रूपांतर स्मार्ट ग्राम योजनेत केले. तेव्हापासून या योजनेची अंमलबजावणी गडचिरोली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे. या योजनेत गावांची विभागणी करण्यात आली. यामध्ये ५०० पेक्षा जास्त लोकसंख्या असणारी मोठ्या ग्रामपंचायती, शहरालगत असणाऱ्या ग्रामपंचायती, पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायती, आदिवासी क्षेत्रातील पेसा ग्रामपंचायती तसेच उर्वरित ग्रामपंचायतीचाही समावेश आहे.
स्मार्ट ग्राम योजनेंतर्गत गावातील स्वच्छतेवर २० गुण, व्यवस्थापनेवर २० गुण, दायित्वासाठी २०, अपारंपारीक ऊर्जा व पर्यावरणासाठी २० तसेच पारदर्शकता व तंत्रज्ञानासाठी १५ असे एकूण १०० गुण ठेवण्यात आले होते. सदर योजनेत सहभागी झालेल्या ग्रामपंचायतीचे राज्यस्तरीय समितीमार्फत फेब्रुवारी ते मार्च महिन्यात मुल्यांकन करण्यात आले होते. ग्रामपंचायतींना त्यांच्या क्षमतेनुसार गुण देण्यात आले. त्यानुसार जि.प. च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे अहवाल पाठविण्यात आला आहे. या अहवालानुसार व समितीच्या निर्णयानुसार गडचिरोली जिल्ह्यातील १२ तालुक्यातील १२ ग्रामपंचायतीची स्मार्ट ग्राम म्हणून निवड झाली आहे. यामध्ये मार्र्कंडादेव, तुळशी, वघाडा, जांभळी, कालिनगर, रामंजापूर, जारावंडी, बोदालदंड, वाकडी, महागाव खुर्द, जांभूळखेडा व आरेवाडा आदी ग्रामपंचायतीचा समावेश आहे. या ग्रामपंचायतींना राज्य शासनातर्फे द्यावयाचा प्रत्येकी १० लाख रूपयांचा निधी जिल्हा परिषद शासनाकडे प्राप्त झाला असल्याची माहिती मिळाली आहे. जि.प. प्रशासनातर्फे लवकरच या ग्रामपंचायतींना निधी अदा करण्यात येणार आहे. स्मार्ट ग्राम म्हणून निवड करण्यात आलेल्या जिल्ह्यातील १२ ग्रामपंचायतीमध्ये चामोर्शी तालुक्यातील मार्र्कंडादेव ग्रामपंचायतीला सर्वाधिक ७९ गुण समितीने दिले आहेत. तर सर्वात कमी गुण भामरागड तालुक्यातील आरेवाडा ग्रामपंचायतीला मिळाले असून त्याची संख्या ५५ आहे. पुढील वर्षी सहभागी गावांची संख्या वाढणार आहे.
स्मार्ट ग्रामसाठी याबाबी आवश्यक
गावात वैयक्तिक शौचालय सुविधा व त्याचा वापर, सार्वजनिक इमारतीमध्ये शौचालय सुविधा व त्याचा वापर, पाणी गुणवत्ता तपासणी, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, पायाभूत सुविधांचा विकास, आरोग्य व शिक्षण विषयक सुविधा, केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी, बचतगट, प्लास्टिक वापरावर बंदी, ग्रा.पं.ची गृह व पाणी कर वसुली, पथदिव्यांची सोय, ग्रामसभांचे आयोजन, एलईडी दिव्यांचा वापर, सौर पथदिवे, बायोगॅस संयंत्राचा वापर, वृक्ष लागवड, जलसंधारण, ग्रामपंचायतीचे संकेतस्थळ आदी बाबी स्मार्ट ग्राम होण्यासाठी गावात असणे आवश्यक आहे.