५०० किमीचा वळसा घालून जनावरांची तेलंगणात तस्करी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2024 02:29 PM2024-11-06T14:29:39+5:302024-11-06T14:31:22+5:30
Gadchiroli : पोलिसांना गुंगारा दुर्गम भागातून कवडीमोल दराने खरेदी
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्याच्या दुर्गम भागात अजूनही मोठ्या प्रमाणात पशुधन आहे. या पशुधनाला आता तस्करांची वक्र दृष्टी लागली आहे. दुर्गम भागातील पशुधन खरेदी करून सुमारे ५०० किमीचे अंतर पार करून तेलंगणा राज्यात तस्करी केली जात आहे. त्यामुळे दुर्गम भागातीलही पशुधन कमी होत असल्याचे दिसून येत आहे.
गडचिरोली जिल्ह्याचा जवळपास ७८ टक्के भाग जंगलाने व्यापला आहे तसेच येथील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती हाच असल्याने मोठ्या प्रमाणात पशुपालन केले जाते. ग्रामीण भागातील पशुंची संख्या कमी झाली असली तरी दुर्गम भागात अजूनही पशुधन कायम आहे. या पशुधनावर आता तस्करांची दृष्ट लागली असल्याचे दिसून येत आहे. तस्करांचे दलाल थेट गावापर्यंत पोहोचले आहेत. सदर दलाल गावातील जनावरे खरेदी करून एखाद्या मध्यवर्ती भागात आणतात. नंतर ही जनावरे एका वाहनात टाकून थेट गडचिरोली-मूल मार्गे तेलंगणात नेले जात आहे.
ठोस कारवाई कधी ?
विशेष म्हणजे अनेक पोलिस ठाणे पार करून या जनावरांची तस्करी केली जात आहे. त्यामुळे पोलिसांच्या या तस्करीकडे दुर्लक्ष कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तस्करांवर ठोस कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
निवडणुकीच्या नाक्यांमुळे तस्करी थंडावली
दुर्गम भागातील जनावरे प्रामुख्य गडचिरोली-मूल मार्गेच नेली जातात. मात्र विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्याच्या सीमांवर पोलिस चौक्या उभारण्यात आल्या आहेत. या ठिकाणी वाहन तपासणी केली जात असल्याने काही दिवस तस्करी थांबली आहे. नाके हटताच पुन्हा तस्करीला सुरुवात होणार आहे.
या भागातून होते जनावरांची खरेदी
ग्रामीण भागात पशुधन आता अत्यंत कमी प्रमाणात उपलब्ध आहे. दुर्गम भागातीलच पशुपालकांकडे पशुधन आहे. त्यामुळे तस्करांनी आपला मोर्चा आता दुर्गम भागाकडे वळवला असल्याचे दिसून येते आहे. कोरची तालुक्यातील काही गावे व धानोरा तालुक्यातील पेंढरी परिसरातील छत्तीसगड राज्याला लागून असलेल्या गावांमधून जनावरांची तस्करी केली जात आहे.