जंगलातील नाल्याच्या प्रवाहातून लाखाेंच्या सागवानाची 'पुष्पा स्टाईल' तस्करी; वनविभागाने पकडले रंगेहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2022 11:25 AM2022-07-22T11:25:10+5:302022-07-22T15:28:54+5:30
अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ चित्रपट प्रक्षेकांच्या पसंतीस उतरला असला तरी आता यातील लाकडांची तस्करी मात्र डोकेदुखी ठरत आहे. कारण तस्करी करणारे आता अशाच प्रकारची शक्कल लढवत असल्याचे दिसत आहे.
जिमलगट्टा (गडचिरोली) : जोरदार पावसानंतर प्रवाहित झालेले जंगलातील नाले आता वनतस्करांच्या पथ्यावर पडत आहेत. या नाल्यांच्या प्रवाहात सोडून लाकडांची रात्रीच्या अंधारात बिनबोभाटपणे वाहतूक करण्याचा फंडा सुरू झाला आहे. वनपरिक्षेत्र कार्यालय देचलीपेठाअंतर्गत वन विभागाच्या कर्मचााऱ्यांनी असाच एक प्रयत्न हाणून पाडत ४ लाख रुपयांचे सागवान लाकडांचे ओंडके जप्त केले.
या पद्धतीने पाण्याच्या प्रवाहातून सागवानाची तस्करी होत असल्याची कुणकुण वन विभागाला लागली होती. त्यामुळे त्यांनी रात्रीची गस्त वाढविली होती. त्याचा फायदा होऊन सागवानाची तस्करी पकडण्यात पथकाला यश आले.
तराफे करून पाण्यातून वाहतूक
नियतक्षेत्र पेरकबट्टीतील मौजा कम्मासूर परिसरातील नाल्याच्या पात्रात मोठमोठे ४ ते ५ सागवान लठ्ठे (ओंडके) एकमेकांना बांधून त्यांचा तराफा करीत ते पाण्यात सोडले होते. असे एकूण १८ नग सागवान लठ्ठे पाण्याच्या प्रवाहातून जात असताना दिसताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तत्परतेने हालचाली करीत ते जप्त केले. हे लठ्ठे सकाळी बैलबंडीने वनविभागाच्या कार्यालयात आणण्यात आले. त्यांची एकूण किंमत ४ लाख ३१ हजार असल्याचे सांगण्यात आले. आरोपी मात्र अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यांचा शोध सुरू आहे.