कोंढाळाच्या नदीपात्रातून रेतीची तस्करी सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 05:00 AM2021-04-14T05:00:00+5:302021-04-14T05:00:31+5:30
महसूल बुडत असूनही महसूल विभाग डोळेझाक करीत असल्याने रेती चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. देसाईगंज तालुक्यातील नदी घाटांचे दरवर्षी लिलाव होऊन लाखो, करोडो रुपयांचा महसूल शासनास एकट्या देसाईगंज तालुक्यातून मिळत असतो. सद्यस्थितीत नदी घाटांचे लिलाव झाले नसल्याने अवैध रेती चोरीचे प्रमाण वाढले आहे. ट्रॅक्टर व इतर साधनांचा वापर करून विनापरवाना वाहतूक करून रेती तस्कर मालामाल होत आहेत.
लाेकमत न्यूज नेटवर्क
कुरुड : देसाईगंजवरून किमी अंतरावर असलेल्या कोंढाळा वैनगंगा नदीपात्रातून रेती चोरीला जाऊ नये तसेच ट्रॅक्टर नेता येऊ नये म्हणून महसूल विभागाने रेती घाटावर व नदी पात्रात खड्डे खोदून ठेवले होते. रेती चोरट्यांनी हे खड्डे बुजविले. त्यानंतर येथून रस्ता करून रेती तस्करी सुरू केली आहे. ट्रॅक्टरद्वारे व इतर साधनांद्वारे रेतीचा अवैधरित्या उपसा केला जात असल्याने महसूल विभागाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.
महसूल बुडत असूनही महसूल विभाग डोळेझाक करीत असल्याने रेती चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. देसाईगंज तालुक्यातील नदी घाटांचे दरवर्षी लिलाव होऊन लाखो, करोडो रुपयांचा महसूल शासनास एकट्या देसाईगंज तालुक्यातून मिळत असतो. सद्यस्थितीत नदी घाटांचे लिलाव झाले नसल्याने अवैध रेती चोरीचे प्रमाण वाढले आहे. ट्रॅक्टर व इतर साधनांचा वापर करून विनापरवाना वाहतूक करून रेती तस्कर मालामाल होत आहेत. कोंढाळा गावानजीकच वैनगंगा नदी आहे. गावानजीक वैनगंगा नदीपात्र असल्याने नेमका याच संधीचा फायदा घेत काही ट्रॅक्टरधारक नदीपात्रातून रेतीचा अवैध उपसा करून रेती विक्री करीत असल्याचे आढळून येत आहे.
रेतीच्या उपशामुळे नदी पात्र खोलगट स्तरापर्यंत पोहोचले आहे. शेकडो ते हजारो ब्रास रेतीचा उपसा यापूर्वी झाला व सद्यस्थितीत सुरूच आहे. ट्रॅक्टरधारकांचे सर्वत्र धागेदोरे व जाळे पसरले असल्याने मोबाईलद्वारे सर्वत्र संपर्क करून इकडे-तिकडे हालहवाला घेतला जातो. रेतीचा अवैधरित्या उपसा केला जातो. रात्री १२ वाजल्यानंतरचा कालावधी रेती चोरांसाठी फलदायी असल्याचे कळते. लाखो रुपयांचा दंड आकारूनही दंडाला न जुमानता चलती का नाम गाडी असे चित्र निर्माण झाले आहे.
रेती चोरीचे प्रकरण होऊ नये, यासाठी आणखी काही बदल करून रेती तस्करीला कसा आळा घालता येईल, याबाबत शासनस्तरावरून उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी हाेत आहे.
इमारत व घर बांधकामे जाेमात
देसाईगंज तालुक्यात शासनाच्या विविध घरकूल याेजनेतून शहरी व ग्रामीण भागातील कुुटुंबांना घरकूल मंजूर करण्यात आले आहे. रेतीच्या तुटवड्यामुळे मध्यंतरीच्या कालावधीत घरकुलाचे काम ठप्प पडले हाेते. मात्र गेल्या आठ-दहा दिवसांपासून तस्करीच्या माध्यमातून रेती खरेदीसाठी उपलब्ध हाेत आहे. ही रेती खरेदी करून घरकूल व इतर इमारत बांधकामे केली जात आहेत.