तस्करीतील ट्रॅक्टर जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 01:35 AM2018-03-24T01:35:05+5:302018-03-24T01:35:05+5:30
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे चामोर्शी तालुक्यातील वाघोली रेती घाटाच्या परिसरात धाड टाकून दोटकुली साझाच्या तलाठ्यांनी रेतीची तस्करी करणारा ट्रॅक्टर पकडला तर संबंधित ट्रॅक्टर मालकाला....
ऑनलाईन लोकमत
चामोर्शी : मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे चामोर्शी तालुक्यातील वाघोली रेती घाटाच्या परिसरात धाड टाकून दोटकुली साझाच्या तलाठ्यांनी रेतीची तस्करी करणारा ट्रॅक्टर पकडला तर संबंधित ट्रॅक्टर मालकाला कायद्यान्वये १ लाख १३ हजार ३०० रूपयांचा दंड ठोठावला. सदर कारवाई २१ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली.
एमएच ३३ एफ १३९९ क्रमांकाचा ट्रॅक्टर वाघोली घाटावरून रेती भरून दोडकुली गावाच्या रस्त्याकडे येत होता. दरम्यान दोटकुलीचे तलाठी एन. एच. चंदनखेडे यांनी सदर रेती भरलेला ट्रॅक्टर अडविला. चालकाकडून टीपीची चौकशी केली असता, ट्रॅक्टर चालक पंकज दशरथ पोरटे यांनी टीपीवर खोडतोड केली असल्याचे दिसून आले. यावरून अवैधरित्या रेतीची तस्करी होत असल्याचे आढळून आले. कारवाई करण्यासाठी ट्रॅक्टर तहसील कार्यालयात आणण्यास सांगितले. दरम्यान चालकाने आपल्या मनमर्जीने ट्रालीमधील रेती खाली केली व ट्रॅक्टर घेऊन घराकडे निघाला. ही बाब माहित होताच तलाठ्यांनी नायब तहसीलदार तनगुलवार यांना सांगितले. तनगुलवार यांनी तहसीलदार येरचे यांच्या मार्गदर्शनात सदर ट्रॅक्टर जप्त केला. ट्रॅक्टर मालकावर महाराष्टÑ जमीन महसूल अधिनियमान्वये १ लाख १३ हजार रूपयांचा दंड ठोठावला.
रेती तस्करी वाढतीवर
चामोर्शी तालुक्याच्या वाघोली रेती घाटाचा लिलाव करण्यात आला नाही. मात्र या घाटावरून रेतीची तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ट्रॅक्टर मालक, चालक प्रशासनाला जुमानत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. नायब तहसीलदारांनी तस्करीतील ट्रॅक्टर मालक धनराज नरूले यांना दंड भरण्याचा पत्र पाठविले आहे.