२२० गावांवर घोंघावतेय जलसंकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 11:19 PM2018-03-01T23:19:59+5:302018-03-01T23:19:59+5:30
यावर्षी जिल्ह्यात पाऊस सरासरीपेक्षा कमी झाल्यामुळे अनेक गावांवर पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवणार आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास विभागाने नुकत्याच दिलेल्या अहवालानुसार ......
ऑनलाईन लोकमत
गडचिरोली : यावर्षी जिल्ह्यात पाऊस सरासरीपेक्षा कमी झाल्यामुळे अनेक गावांवर पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवणार आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास विभागाने नुकत्याच दिलेल्या अहवालानुसार एप्रिल ते जून या कालावधीत जिल्ह्यातील जवळपास २२० गावांमधील नागरिकांना जलसंकटाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
गेल्यावर्षीच्या तुलतने यावर्षीच्या पावसाळ्यात (वर्ष २०१७) कमी पाऊस झाला. जिल्ह्यात वार्षिक सरासरी १३५४.७८ मिमी पाऊस होतो. परंतू यावर्षी जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या कालावधीत १०११.३३ मिमी पाऊस बरसला. पावसाचे हे प्रमाण सरासरीपेक्षा ३४३.४५ मिमी कमी झाले आहे. म्हणजेच सरासरीच्या तुलनेत ७४.६५ टक्केच पाऊस झाला आहे. परिणामी जलाशयांमध्ये पुरेशा प्रमाणात जलसाठा राहू शकला नाही. पाण्याचे स्त्रोतही आता आटण्याच्या मार्गावर आहेत. नदी, नाल्यांपासून अनेक विहिरींचीही पाणी पातळी खालावली आहे.
गडचिरोली शहरवासियांची तहान भागविणाºया वैनगंगा नदीतील पाण्याची पातळीही खालावली आहे. काही दिवसांपूर्वी नगर पालिकेच्या वतीने नदीत रेतीचा बांध तयार करून पाणी रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला.
गडचिरोलीतील भूजल सर्वेक्षण और विकास यंत्रणेच्या वरिष्ठ भूवैज्ञानिकांकडून जानेवारी महिन्यात भुजल पातळीचे सर्व्हेक्षण करण्यात आले. त्यात भूजल पातळी खालावल्याचे आणि येणाºया दिवसात ती आणखी खालावणार असल्याचे स्पष्ट झाले. त्यातच एप्रिल ते जून या कालावधीत जिल्ह्यातील २२० गावांमध्ये जलसंकट निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामुळे त्या गावांच्या परिसरातील ९८ हजार १११.६१ हेक्टर क्षेत्र प्रभावित होणार आहे. परिणामी उन्हाळी धान किंवा इतर पिकांना पाणी देण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागणार आहे.
भूजल यंत्रणेच्या सर्व्हेक्षणानुसार केवळ मुलचेरा तहसीलमधील भूजल पातळी ०.२८ मीटरने वाढली आहे. मात्र इतर ११ तालुक्यातील भूजल पातळीत खाली गेली आहे. त्यात गडचिरोली जिल्ह्यात ०.१२ मीटर, आरमोरी ०.३९ मीटर, धानोरा ०.४७ मीटर, देसाईगंज ०.४३ मीटर, चामोर्शी ०.३८ मीटर, कोरची ०.९१ मीटर, अहेरी ०.३८ मीटर, एटापल्ली ०.३० मीटर, भामरागड ०.५१ मीटर आणि सिरोंचा ०.०६ मीटर एवढी भूजल पातळी खालावली आहे.
धानोरा तालुक्यात ६५ गावे होणार बाधित
अहवालानुसार छत्तीसगड सीमेलगत धानोरा तालुक्यातील जवळपास ६५ गावांमध्ये येणाºया दिवसात जलसंकट तीव्र होण्याची शक्यता आहे. आरमोरी आणि मुलचेरा तालुक्यातील सर्वात कमी गावांना याचा फटका बसणार आहे.
हातपंप दुरूस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
हातपंप दुरूस्त करणे पंचायत समितीच्या यांत्रिक विभागाची जबाबदारी आहे. मात्र हातपंप दुरूस्त केले जात नाही. परिणामी दुर्गम भागात पाणी टंचाईची समस्या गंभीर होते. मात्र या भागातील नागरिक तक्रारी करीत नसल्याने सदर समस्या लक्षात येत नाही. हातपंप वेळीच दुरूस्त करणे गरजेचे आहे.