सर्पदंशाने वसतिगृहातील दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 04:44 PM2017-08-02T16:44:43+5:302017-08-02T16:47:22+5:30

चामोर्शी तालुक्यातील वायगाव (येनापूर) येथील समता मागासवर्गीय वसतिगृहात राहून वायगाव येथीलच डॉ. बी.आर. आंबेडकर हायस्कूलमध्ये इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेत असलेल्या दोन विद्यार्थ्यांचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास उघडकीस आली.

Snake bite take away two students in Gadchiroli | सर्पदंशाने वसतिगृहातील दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

सर्पदंशाने वसतिगृहातील दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

Next
ठळक मुद्देवायगाव येथील घटना चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी (जि.गडचिरोली) : चामोर्शी तालुक्यातील वायगाव (येनापूर) येथील समता मागासवर्गीय वसतिगृहात राहून वायगाव येथीलच डॉ. बी.आर. आंबेडकर हायस्कूलमध्ये इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेत असलेल्या दोन विद्यार्थ्यांचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास उघडकीस आली. एक विद्यार्थी चामोर्शी येथील ग्रामीण रूग्णालयात उपचार घेत असून इयत्ता दहावीचा विद्यार्थी धम्मदीप सुनील रामटेके (१६) रा. येल्ला याला उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
रितिक घनश्याम गुडी (१५) रा. पानोरा पो. धामनगाव ता. गोंडपिपरी व अतुल संजय कुद्रपवार (१५) रा. पानोरा ता. गोंडपिपरी जि. चंद्रपूर अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. रितिक गुडी व अतुल कुद्रपवार या दोघांना रात्री गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात भरती करण्यात आले. यानंतर रात्री १.४५ वाजता रितिक गुडी या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. काही वेळातच अतुल कुद्रपवार याचाही मृत्यू झाला. रुग्णालयात आणल्यावर अतुल हा मृतावस्थेतच होता, अशी माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. तर धम्मदीप सुनील रामटेके रा. येला ता. मुलचेरा या विद्यार्थ्याला चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे. वायगाव येथे मिलींद ज्ञान प्रसारक शिक्षण संस्था नवरगाव ता. सिंदेवाहीद्वारा संचालित मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह आहे. या वसतिगृहात २४ मुले निवासी राहतात. हे विद्यार्थी डॉ. बी.आर. आंबेडकर हायस्कूलमध्ये शिक्षण घेतात. विद्यार्थ्यांच्या मृत्यूची बातमी कळताच पालकांनी रूग्णालयात धाव घेतली. या घटनेसंदर्भात गडचिरोली पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे.
जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणलेल्या या दोन्ही विद्यार्थ्याचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज येथील वैद्यकीय अधिकाºयांनी व्यक्त केला आहे. मात्र मृतदेहाच्या शवविच्छेदनाच्या अहवालानंतर या विद्यार्थ्यांच्या मृत्यूचे खरे कारण कळणार आहे. या घटनेने सामाजिक विभागासह शैक्षणिक क्षेत्रात खळबळ माजली आहे.
वसतिगृहात सोयीसुविधांचा अभाव
गेल्या २५ वर्षांपासून हे वसतिगृह सुरु असून या वसतिगृहात अद्यापही बेडची व्यवस्था नाही. सदर वसतिगृहाची इमारतही जुनी व कौलारू आहे. या वसतिगृहात केवळ दोन खोल्या आहेत. शौचालय व बाथरूमची व्यवस्था आहे. मात्र या वसतिगृहाला संरक्षण भिंत नाही. बेड नसल्याने येथील विद्यार्थी खाली गादीवर झोपतात. शासनाच्या निकषानुसार या वसतिगृहात सोयीसुविधा नसल्याने विद्यार्थ्यांची हेळसांड होत असते. मात्र या वसतिगृहाकडे सामाजिक न्याय विभागाचे तसेच संस्थेचे दुर्लक्ष होत आहे.
सखोल चौकशी करा
वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या सदर मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करून पालकांना नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी भारतीय मानवाधिकार परिषदेचे प्रदेश अध्यक्ष गजेंद्र डोमळे व मृतक विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली आहे.

Web Title: Snake bite take away two students in Gadchiroli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.