सतर्कतेने टाळता येईल सर्पदंश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 11:07 PM2019-07-16T23:07:28+5:302019-07-16T23:08:00+5:30

तीव्र उन्हामुळे जमिनीतील बिळात घर करून असलेले सरपटणारे प्राणी पाऊस पडताच बाहेर येतात. परिणामी दरवर्षी पावसाळ्यात सर्पदंशाने अनेक लोकांचा मृत्यू होतो. पावसाळा सुरू झाल्यापासून जवळपास हिवाळा संपेपर्यंत काळजी व खबरदारी घेणे आवश्यक आहे. सर्पदंश होऊ नये म्हणून सतर्कता बाळगल्यास कोणताही व्यक्ती प्राणाला मुकणार नाही.

The snake can be avoided by alertness | सतर्कतेने टाळता येईल सर्पदंश

सतर्कतेने टाळता येईल सर्पदंश

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्ह्यात चार विषारी प्रजाती : पावसाळ्यापासून सुरू होतो सापांचा संचार

गोपाल लाजूरकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : तीव्र उन्हामुळे जमिनीतील बिळात घर करून असलेले सरपटणारे प्राणी पाऊस पडताच बाहेर येतात. परिणामी दरवर्षी पावसाळ्यात सर्पदंशाने अनेक लोकांचा मृत्यू होतो. पावसाळा सुरू झाल्यापासून जवळपास हिवाळा संपेपर्यंत काळजी व खबरदारी घेणे आवश्यक आहे. सर्पदंश होऊ नये म्हणून सतर्कता बाळगल्यास कोणताही व्यक्ती प्राणाला मुकणार नाही.
गडचिरोली जिल्ह्यात सापाच्या चार विषारी प्रजाती आढळतात. यामध्ये नाग, मण्यार, घोणस, व क्वचितच आढळणारा फुरसे आदींचा समावेश आहे. सौम्य विषारी सापांमध्ये मांजऱ्या, हरणटोळ यांचा तर बिनविषारी सापांमध्ये धोंड्या, धामण, नानेटी (वास्या) , डुरक्या घोणस (चिखल्या), कुकरी, कवड्या, धूळ नागीण, रुका, तस्कर आदी सापांचा समावेश होतो. या सापांचा संचार सर्वत्र दिसून येतो. प्रसंगी हे साप लोकवस्तीकडे येतात.
यंदा मागील एक ते दीड महिन्याच्या कालावधीत कोटगल, इंदाळा, मुडझा, वाकडी, बोदली, लांझेडा, नवेगाव, कॉम्प्लेक्स आदी भागातून जवळपास ६० सापांना सर्पमित्रांनी पकडून जंगलात सुरक्षितरित्या जीवदान दिले आहे. यामध्ये २० विषारी तर ४० निमविषारी व बिनविषारी सापांचा समावेश आहे, अशी माहिती सर्पमित्रांनी दिली.
घर अथवा परिसरारात साप आढळून आल्यास सर्पमित्र अजय कुकडकर ९५४५४९१०५९, पंकज फरकाडे ८६००५५८८८३, प्रशिक झाडे ९४२२७२८५६३, दैवत बोदेले ९५४५३१०७९४, अनुप म्हशाखेत्री ९४२२५५९६०६, गणेश देवावार ९४०३२९९०४४, राकेश नैताम ८६०५१०६००१, मकसूद सय्यद ७२१८१४८५८६, सौरभ सातपुते ७८८८२६४१६९ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सर्पमित्रांनी केले आहे.
सर्पमित्र वन्यजीव व कल्याणकारी संस्थेच्या वतीने जिल्ह्यात सापांच्या बचावासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे सापांचे संवर्धन होण्यास मदत होत आहे.
अशी घ्यावी काळजी
कोणताही साप स्वत:हून माणसावर हल्ला करीत नाही. अनेकवेळा बिनविषारी साप दंश केला तरी भीतीमुळे व्यक्तीचा मृत्यू होतो. त्यामुळे सर्पदंश टाळण्यासाठी आपल्या घराच्या बाहेरील भिंतीमध्ये किंवा संरक्षक भिंतीमध्ये असलेली भोके बुजवावी. घराच्या परिसरात पालापाचोळा व केरकचरा साचू देऊ नये. घराच्या खिडक्या, दारे किंवा घरास लागून असलेल्या झाडाच्या फांद्या अथवा वेली तोडाव्या. पाळीव पशुपक्ष्यांना घरापासून दूर सुरक्षित ठिकाणी ठेवावे. उंदीर हे सापाचे आवडते खाद्य आहे. त्यामुळे घरात उंदरांचा वावर वाढू नये, याची काळजी घ्यावी. रात्री घराबाहेर पडताना हातात बॅटरी व पाया जोडे लावावे. सरपण घरात न ठेवता काही अंतरावर व जमिनीपासून थोड्या उंचीवर ठेवावे. काही साप पाण्यामध्ये असतात, त्याकरिता बाथरूम, घराजवळील नालीत पाणी साचू देऊ नये, आंघोळ करण्यापूर्वी जागेची पाहणी करावी. हातावर झालेला सर्पदंश हा मुख्यत: हातांच्या हालचालीमुळे होतो. शेतात विळ्याने गवत कापताना होणारी हालचाल सापांना घाबरवून टाकते आणि ते स्वत:च्या रक्षणार्थ दंश करतात. सरपण गोळा करताना लाकडाखाली असलेला साप दंश करण्याची शक्यता असते, त्यामुळे अशी कामे करताना काळजी घ्यावी. घरात किंवा घराबाहेर अनावश्यक वस्तूंचा ढीग करणे टाळावे. शिल्लक राहिलेल्या विटा, दगड हे सापांना लपण्यासाठी उत्तम जागा असते. त्यामुळे अनावश्यक ढीग ठेवू नये.
साप आढळल्यास हे करावे; दंश झाल्यास असा करावा प्रथमोपचार
साप घरात आढळल्यास त्याला न मारता जाणकार, अनुभवी साप पकडणाऱ्यास बोलवावे, सापाला लपण्याच्या जागेपासून दूर सारण्याचा प्रयत्न करावा. साप पकडणारा येणे शक्य नसल्यास स्वत: त्या सापास पकडण्याचा प्रयत्न करू नये. लांब काठीचा वापर करून त्याला घराबाहेर हाकलण्याचा प्रयत्न करावा. जर साप आपल्या समोरासमोर आल्यास घाबरून न जाता स्तब्ध उभे राहून आपल्या जवळील रूमाल, पिशवी, पर्स सापाच्या तोंडासमोर टाकावी. त्यामुळे साप या वस्तूंकडे आकर्षित होईल. या वेळेत आपल्याला मार्ग बदलता येऊ शकतो.
सर्पदंश झाल्यानंतर अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे प्रथमोपचार. प्रथमोपचार केल्यास सापाच्या विषाचा प्रभाव कमी होऊ शकतो. सर्पदंश झाल्यास जखम स्वच्छ धुवावी. रूंद बँडेज अथवा कापडाची रूंद पट्टी बांधावी. दंश झालेला भाग स्थिर ठेवावा. डॉक्टरांकडे पोहोचेपर्यंत बँडेज काढू नये. विशेष म्हणजे विषारी घोणस किंवा फुरसे चावल्यास बँडेज बांधू नये. सर्पदंश झालेली व्यक्ती घाबरत असते. संबंधित व्यक्तीचा धीर खचू नये, यासाठी आधार द्यावा. चालणे, बोलणे यासारखे श्रम टाळून शांत राहण्यास सांगावे. दंश झालेल्या व्यक्तीस दमा अथवा कोणत्याही प्रकारची अ‍ॅलर्जी असल्यास डॉक्टरांकडे गेल्यानंतर ही बाब त्यांच्या निदर्शनास आणावी.

पावसाळ्यात शहर व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात सापांचा संचार असतो. सापांपासून धोका होतो, या भावनेतून नागरिक सापांना मारून टाकतात. त्यामुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर सापांचा बळी जातो. यामध्ये दुर्मीळ सापांचाही समावेश असतो. त्यामुळे कुणीही सापाला घाबरून जाऊन त्याच्यावर हल्ला करून स्वत:चा जीव धोक्यात घालू नये तर तत्काळ सर्पमित्रांशी संपर्क करून सापाला जीवदान द्यावे.
- अजय कुकुडकर, सर्पमित्र, गडचिरोली

Web Title: The snake can be avoided by alertness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.