...तर फडणवीस यांनी गडचिरोलीचे पालकमंत्रीपद सोडावे, काँग्रेस नेते सुभाष धोटेंची मागणी
By संजय तिपाले | Published: December 1, 2023 03:13 PM2023-12-01T15:13:43+5:302023-12-01T15:14:33+5:30
जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाच्या पाहणीसाठी आमदार सुभाष धोटे जिल्ह्यात आले होते.
गडचिरोली: जिल्ह्यात रानटी हत्ती, वाघांनी धुडगूस घातला आहे. शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ अन् अतिवृष्टीची भरपाई मिळत नाही, लोहवाहतुकीमुळे अपघात वाढले आहेत. जाचक वनकायद्यांमुळे विकासकामे अडली आहेत, पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्ह्यात येत नाहीत. त्यांना निष्क्रिय म्हणणार नाही, पण जमत नसेल तर त्यांनी पालकमंत्रीपद सोडावे व दुसऱ्या कोणाला तरी द्यावे, अशी मागणी काँग्रेसचे चंद्रपूरचे आमदार सुभाष धोटे यांनी येथे १ डिसेंबरला पत्रकार परिषदेत केली.
जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाच्या पाहणीसाठी आमदार सुभाष धोटे जिल्ह्यात आले होते. पाहणीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी माजी खासदार मारोतराव कोवासे, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी. काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, प्रदेश महासचिव डॉ. नामदेव किरसान, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा ॲड. कविता मोहरकर, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव विश्वजित कोवासे, शहराध्यक्ष सतीश विधाते, समशेर खान पठाण उपस्थित हाेते.
यावेळी आमदार धोटे म्हणाले, जिल्ह्यात काँग्रेसचा एकही आमदार नाही. या भागातील लोकांचे प्रश्न समजून घेऊन विधिमंडळ अधिवेशनात मांडण्यासाठी जिल्ह्यात दौरा केला आहे. ते म्हणाले, रानटी हत्ती, वाघांचा बंदोबस्त झाला पाहिजे. यासाठी काँग्रेसने चंद्रपूरमध्ये मोर्चा काढला. यावर ११ डिसेंबरला नागपूरला वनमंत्र्यांनी बैठक बोलावली आहे.
आदिवासींनी वनसंवर्धन केले म्हणजे म्हणजे पाप केले का असा सवाल करुन ते म्हणाले, विकासकामे करताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी वन कायद्यात शिथिलता आली पाहिजे. याकरता लोकप्रतिनिधींनी बोलले पाहिजे. पालकमंत्रीपद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे, ते विदर्भाचे असल्याने अपेक्षा आहेत, पण ते पक्षाचे स्टार प्रचारक आहेत. त्यांना राज्याबाहेरही फिरावे लागते. त्यामुळे त्यांचे दुर्लक्ष झाले आहे. त्यांनी पालकमंत्रीपद सोडावे व धर्मरावबाबा आत्राम किंवा इतर कोणाला तरी जबाबदारी द्यावी,अशी विनंती करणार असल्याचे धोटे यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना एक रुपयांत पीकविम्याची घोषणा केली, पण लाभ मिळाला नाही, अतिवृष्टी भरपाईपासून शेतकरी वंचित आहेत. आता अवकाळी पावसाचे पंचनामे जलदगतीने करुन भरपाई द्यावी, अशी मागणी सरकारकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सरकारच्या नियोजनाअभावी जातीयवाद वाढला
जेव्हापासून राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत आले तेव्हापासून जातीजातीत भांडणे सुरु झाली, असा आरोप आमदार सुभाष धोटे यांनी केला. हे खोके सरकार असल्याची टीका करत ते म्हणाले, मराठा- ओबीसी वाद सुरु आहे, आता आदिवासी व धनगर समाजात वाद निर्माण झाला आहे. सरकार सगळ्यांनाच आश्वासन देत आहे, पण प्रश्न सोडविण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना यश मिळत नाही, अशी टीका त्यांनी केली.