तर आम्ही 'प्रधानमंत्री जनमन' कार्यक्रमावर बहिष्कार टाकणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2024 02:27 PM2024-09-09T14:27:30+5:302024-09-09T14:28:17+5:30
मार्गाची दुरुस्ती करावी : पोटेगावातील नागरिकांचा इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली- पोटेगाव मार्गाची सध्या दुरवस्था झाली आहे. या मार्गाने ये-जा करताना परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. अशातच पोटेगाव येथे १० सप्टेंबर रोजी प्रधानमंत्री जन मन कार्यक्रम नियोजित आहे. सदर कार्यक्रमाच्या निमित्ताने या रस्त्याची दुरस्ती करावी, अन्यथा पोटेगाव परिसरातील नागरिक सदर कार्यक्रमावर बहिष्कार टाकणार, असा इशारा या भागातील नागरिकांनी दिला.
जिल्हाधिकारी, जि.प. सीईओ यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पोटेगाव ते गडचिरोली हा ३० किमी अंतराचा रस्ता आहे. गडचिरोली ते गुरवळापर्यंत हा स्ता व्यवस्थित आहे. पुढे या रस्त्याची अत्यंत दुर्दशा झालेली आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेक अपघात झालेले आहेत. हा मार्ग जंगलातून गेलेला असल्याने रस्त्यात वाहन बंद पडल्यास रानटी प्राण्यांचा हल्ला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदर मार्गाचे नूतनीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली. जिल्हा परिषद सीईओ आयुषी सिंह यांना निवेदन देताना अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद विदर्भ विभाग गडचिरोली युवा जिल्हा अध्यक्ष विनोद मडावी, धनराज दामले, रामदास शेरकी, पी. के. मडावी, आझाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष राज बनसोड, किरण भनारे, अंकुश कोकोडे, चामोर्शीचे अध्यक्ष सोनू कुमरे यांनी केली.
रस्त्याच्या दुरवस्थेमुळे पर्यटकही त्रस्त
पोटेगाव मार्गाने मानव विकास मिशनच्या बसेस धावतात. विद्यार्थ्यांसाठी धावणाऱ्या बसेससुद्धा रस्त्यात बंद पडत आहेत. एटापल्ली, मुलचेरा, चामोर्शी या भागातील रुग्ण याच मार्गाने गडचिरोली येथे येतात. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अनेकदा रुग्णवाहिकासुद्धा बंद पडतात. याच भागात गुरवळा जंगल सफारी व मुतनूर पहाडी हे पर्यटन स्थळ आहे. या भागात पर्यटकांचा ओढा असतो.