मग ‘एक्साईज’ची गरज काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 11:28 PM2018-06-11T23:28:37+5:302018-06-11T23:28:47+5:30
गेल्या २५ वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असली तरी बंदी दारू कोणत्याही कोपऱ्यात मिळते हे सर्वश्रृत आहे. विदेशी दारू कशी मिळते, कुठून येते, कोण आणते याची माहिती दारू रोखण्याची जबाबदारी असणाऱ्यांना चांगल्या प्रकारे माहीत आहे.
मनोज ताजने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गेल्या २५ वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असली तरी बंदी दारू कोणत्याही कोपऱ्यात मिळते हे सर्वश्रृत आहे. विदेशी दारू कशी मिळते, कुठून येते, कोण आणते याची माहिती दारू रोखण्याची जबाबदारी असणाऱ्यांना चांगल्या प्रकारे माहीत आहे. रात्रीच्या अंधारात चालणारा हा व्यवहार सामान्य माणसाला उघडपणे दिसत नाही हा भाग निराळा. मात्र ग्रामीण भागात प्रत्येक गावात मोठ्या प्रमाणात काढल्या जाणारी हातभट्टीची दारू खुलेआमपणे दिसत असतानाही ती रोखण्याचे धाडस केले जात नाही, ही वास्तविकता आहे.
खरं म्हणजे हातभट्टीसारख्या अवैध दारूला आळा घालण्याचे काम पोलिसांपेक्षा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आहे. पण होणाऱ्या कारवायांचे प्रमाण पाहिले तर या जिल्ह्यात एक्साईज विभाग आहे की नाही, अशी शंका यायला लागते. इतर जिल्ह्यांत अधिकृत दारूची नियमानुसार विक्री वाढवून महसुलाचे ‘टार्गेट’ पूर्ण करण्याचे काम हाच एक्साईज विभाग करतो. त्यासाठी शासनाच्या महसूल बुडतो म्हणून हातभट्ट्यांवर नियमित कारवाया केल्या जातात. पण गडचिरोली जिल्ह्यात हातभट्टीची दारू इतर जिल्ह्यांच्या तुलनेत किमान १० पटीने जास्त असताना कारवाया मात्र नगण्य आहेत. तब्बल दोन-दोन लाख रुपयांचा सडवा दोन-तीन छोट्या गावात मिळतो तर जिल्हाभरातील दिड हजारांवर गावांत किती दारू गाळली जात असेल याची कल्पना येते. तरीही राज्य उत्पादन शुल्क विभाग झोपा काढतो. कारवाया का होत नाही, असे विचारले तर ‘आमच्याकडे स्टाफच नाही’ असे म्हणून या विभागाचे अधिकारी मोकळे होतात. पण केवळ या उत्तराने त्यांची जबाबदारी संपते असे नाही. मुळात कारवाई करायची असेल तर इतर जिल्ह्यांच्या स्टाफचे सहकार्य घेऊन अधूनमधून मोहीम राबवितात येतात. बाकी जिल्ह्यात लगतच्या जिल्ह्याची मदत घेऊन अशा मोहीमा सुरू असतात. मग गडचिरोलीतच का नाही? आणि जर काहीच करायचे नसेल तर या विभागाची जिल्ह्यात गरज काय?
प्रत्येक गावावर बारीक लक्ष ठेवणाऱ्या पोलीस विभागालाही गावातल्या हातभट्ट्यांची कल्पना असते. पण मुक्तीपथवाल्यांनी सांगितले म्हणून (नाईलाजाने?) ते अलिकडे कारवाया करायला लागले. व्यसनमुक्तीसाठी व्यसनी माणसाची मानसिकता बदलविणे हाच उपाय आहे. पिणाराच नसेल तर दारू गाळणे आपोआप बंद होईल. त्यामुळे मुक्तीपथवाल्यांनी दारू पकडण्यापेक्षा जनजागृतीवर जास्त भर दिला पाहीजे. उगीच पोलीसवाल्यांना दिसले नाही ते आपण त्यांना दाखविले अशा गैरसमजुतीत राहू नये. पोलिसांना सर्वच माहीत असते. बस कारवाई करण्याची मानसिक तयारी नसते.