देसाईगंज शहरातील बायपास रस्त्याचे भिजत घाेंगडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:39 AM2021-03-23T04:39:09+5:302021-03-23T04:39:09+5:30
सिरोंचा-आष्टी-चामोर्शी-गडचिरोली-आरमोरी-देसाईगंज-साकोली या राज्य मार्ग ३५३ सीचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या संदर्भात २ जानेवारी २०१६ ...
सिरोंचा-आष्टी-चामोर्शी-गडचिरोली-आरमोरी-देसाईगंज-साकोली या राज्य मार्ग ३५३ सीचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या संदर्भात २ जानेवारी २०१६ ला तांत्रिक निविदाही काढण्यात आली होती. नवनिर्मित राष्ट्रीय महामार्गासाठी १६२.२२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात येऊन सदर काम तीन महिन्यांत पूर्ण करायचे होते. मात्र, हे काम संथगतीनेच सुरू झाले. सद्य:स्थितीत काम बंदच असल्याने सदर मार्ग शहराच्या जुन्याच मार्गाने जाणार की बायपासने, याबाबत अद्यापही संभ्रम कायम आहे.
भूमिगत पुलाच्या अप्रोच मार्गांवरून केवळ दुचाकी, ट्रॅक्टर, कार, चारचाकी वाहनेच आवागमन करू शकतात. तसेच रेल्वे पुलाची उंची केवळ ३.६० मीटरच असल्याने मालवाहतूक वाहने बायपास मार्गाने वळवण्यावाचून पर्याय नाही. मात्र, या मार्गाची झालेली दुरवस्था पाहून जड वाहतूकदारांची डोकेदुखी वाढली आहे. सध्या वाहतुकीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
विशेष बाब अशी की, रेल्वे गाड्यांच्या आवागमनामुळे वेळोवेळी रेल्वे फाटक बंद करण्यात येत असल्याने तासनतास वाहतुकीचा खोळंबा होताे. यामुळे जड वाहने उभी ठेवावी लागतात. त्यातही तीन किलोमीटर अधिकचा फेरा मारून वाहतूक करावी लागत असल्याने व हा मार्ग अद्यापही दुर्लक्षित असल्याने बांधकामाचे भिजत घोंगडे कायम आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त हाेत आहे. जड वाहतुकीच्या सोयीसाठी तातडीने या रस्त्याचे बांधकाम करण्याची मागणी देसाईगंजच्या संकल्प सेवा समितीने मुख्याधिकारी कुलभूषण रामटेके यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
बाॅक्स
फ्लायओव्हरची गरज
देसाईगंज शहरात वाढत्या लोकसंख्येमुळे वाहतूकही वाढली आहे. दुचाकी, चारचाकी वाहने तसेच मालवाहतूक वाहनांचेही आवागमन असते. शहरातील वाढती वाहतूक लक्षात घेता येथे फ्लायओव्हर निर्माण करण्याची गरज आहे. तेव्हाच येथील वाहतुकीची समस्या सुटू शकते; परंतु संबंधित विभाग या समस्येकडे लक्ष देणार काय, असा सवाल नागरिक करीत आहेत.