हत्तींना काम नाही म्हणून ते वनविभागाला झाले नकोसे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2022 01:59 PM2022-02-01T13:59:21+5:302022-02-01T14:04:07+5:30

हत्ती हे वनविभागासाठी अभिमानास्पद असताना हत्ती आर्थिकदृष्ट्या परवडत नाही, असे म्हणणे ही बाब लाजिरवाणी असल्याचे संस्थेने म्हटले आहे.

social activist wrote a letter to stop transfer of Elephants of Kamalapur | हत्तींना काम नाही म्हणून ते वनविभागाला झाले नकोसे!

हत्तींना काम नाही म्हणून ते वनविभागाला झाले नकोसे!

googlenewsNext
ठळक मुद्देग्रीन प्लॅनेट सोसायटीची खंत, मुख्यमंत्र्यांना पत्र

गडचिरोली : चंद्रपूर आणि गडचिरोली येथील १३ हत्तींचे स्थानांतरण करण्याचे आदेश वनविभागाला आले आहेत. गडचिरोलीत सर्व स्तरातून याला विरोध होत असताना आता ग्रीन प्लॅनेट सोसायटीनेही मुख्यमंत्री, तसेच प्रोजेक्ट एलिफंट डिव्हिजन आणि सेंट्रल झू ॲथाॅरिटी यांना पत्र पाठवून आपला विरोध दर्शविला, तसेच काही मार्गदर्शक सूचनाही केल्या आहेत. आज या हत्तींना काम नाही म्हणून ते वनविभागाला नकोसे झाले, अशी खंतही या संस्थेने व्यक्त केली.

प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी २३ नोव्हेंबर २०२१ रोजी ताडोबाचे क्षेत्र संचालक आणि गडचिरोलीचे वनसंरक्षक यांना पत्र लिहून १३ हत्तींचे स्थानांतरण जामनगर (गुजरात)च्या राधेकृष्ण टेम्पल वेल्फेअर ट्रस्टला सुपूर्द करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. हे आदेश देताना त्यांनी केंद्र सरकारच्या विभागांसह महाराष्ट्र शासनाकडूनही त्याबाबत परवानगी मिळाल्याचा उल्लेख केला आहे. यामुळे या सर्व हालचालींची राज्य शासनाला कल्पना असल्याचे स्पष्ट होते. शासनाने हत्तींना बंदिस्त संग्रहालयात नेण्याऐवजी त्यांच्या नैसर्गिक अधिवासात राहू द्यावे, अशी विनंती ग्रीन प्लॅनेट सोसायटीचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे, कोषाध्यक्ष प्रा. योगेश दुधपचारे आणि सदस्य प्रा. सचिन वझलवार, आदींनी केली आहे.

वन्यजीव विभाग म्हणते, हत्ती पोसायला पैसे नाही

राज्य वन्यजीव विभागाच्या मते कॅम्पमधील सर्व हत्ती निरुत्पादक आणि अप्रशिक्षित आहेत. वन्यजीव विभाग प्रमुखांनी काही प्रसार माध्यमांशी बोलताना ताडोबा आणि गडचिरोली येथे हत्तींची काळजी घ्यायला, त्यांना खाऊ घालायला वनविभागाकडे पैसे नाहीत, त्यांची काळजी घ्यायला पुरेसे कर्मचारी नाहीत असे म्हटले आहे. याला ग्रीन प्लॅनेट सोसायटी या पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थेने आक्षेप घेतला आहे. हत्ती हे वनविभागासाठी अभिमानास्पद असताना हत्ती आर्थिकदृष्ट्या परवडत नाही, असे म्हणणे ही बाब लाजिरवाणी असल्याचे संस्थेने म्हटले आहे.

...म्हणून हत्ती येथे राहिले पाहिजेत

१) प्राचीन काळापासून गडचिरोली, चंद्रपूर आणि विदर्भ हा हत्तींचा मूळ अधिवास आहे. गोंड राजाच्या राजचिन्हावरही हत्ती आहे. अधूनमधून गडचिरोलीत जंगली हत्ती येत असतात. त्यामुळे चंद्रपूर आणि गडचिरोली येथील पाळीव हत्ती नैसर्गिक अधिवासात सुरक्षित राहू शकतात. हे हत्ती महाराष्ट्रातील वनात असणे अभिमानास्पद आहे.

२) कमलापूरचे हत्ती पाहण्यासाठी विदर्भातील आणि तेलंगणातील नागरिक येतात. पर्यटन विकास केला तर हत्तीसाठी पुरेसे मनुष्यबळ आणि आर्थिक मदत सहज उपलब्ध होऊ शकते. पर्यटनातून येणाऱ्या पैशावर हत्तींचे संरक्षण, कर्मचारी आणि औषधोपचार सहज करता येईल.

३) गडचिरोलीत वन्यजीवांच्या सर्वाधिक शिकारींच्या घटना घटत असत. परंतु आता जागरूकतेने सर्व ग्रामीण, आदिवासी नागरिक आणि वन्यजीव संस्था एकत्र येऊन हत्ती हलविण्यास विरोध करू लागले आहेत. या निमित्ताने हत्ती आणि वन्यजीवांसाठी वाढते प्रेम पाहून वन्यजीव - मानव संघर्ष कमी होण्यास मदत होईल.

Web Title: social activist wrote a letter to stop transfer of Elephants of Kamalapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.