मुख्यमंत्री मित्र करणार योजनांचे सोशल आॅडिट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2016 01:41 AM2016-05-18T01:41:07+5:302016-05-18T01:41:07+5:30
राज्य शासनाच्या योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याबरोबरच शासकीय योजनांची अंमलबजावणी कशी केली जात आहे,
पत्रकार परिषद : श्वेता शालिनी यांची माहिती
गडचिरोली : राज्य शासनाच्या योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याबरोबरच शासकीय योजनांची अंमलबजावणी कशी केली जात आहे, याची माहिती राज्य शासनाला प्राप्त व्हावी, या उद्देशाने गडचिरोली जिल्ह्यात १० ते १५ मुख्यमंत्री मित्र नेमले जातील, अशी माहिती भाजपच्या प्रदेश प्रवक्त्या श्वेता शालिनी यांनी दिली आहे.
सेवानिवृत्त अधिकारी, महिला, युवक, आयटी क्षेत्रातील जाणकार, अध्यापक, शेतकरी, समाजसेवक आदींमधून मुख्यमंत्री मित्राची नेमणूक केली जाणार आहे. प्रत्येक कार्यालयात जाऊन नागरिकांना प्रश्न विचारून सोशल आॅडीट करणे सरकारच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे, राज्य सरकारने सुरू केलेल्या ‘आपले सरकार’ या पोर्टलबद्दल जनजागृती करून तक्रारी नोंद करण्याचे काम मुख्यमंत्री मित्रांना करावे लागणार आहे.
मुख्यमंत्री मित्राने पाठविलेल्या माहितीची मुख्यमंत्री कार्यालयाकडून दखल घेतली जाणार आहे. मुख्यमंत्री मित्राला मात्र राज्य शासनाकडून कोणतेही मानधन दिले जाणार नाही. मुख्यमंत्री मित्र निवडताना त्याची प्रतिभा व प्रतिमा मुख्यमंत्र्याप्रमाणे असावी, आठवड्यातून किमान १० तास शासकीय कामासाठी देणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री मित्रांना जूनमध्ये प्रशिक्षण दिले जाईल व जुलैमध्ये कामाला सुरूवात होईल, अशी माहिती शालिनी यांनी दिली. यावेळी खा. अशोक नेते, रवींद्र ओल्लालवार, प्रमोद पिपरे, जि.प. सदस्य प्रशांत वाघरे उपस्थित होते.