लोकशाहीचे सामाजीकरण आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 11:18 PM2018-08-12T23:18:47+5:302018-08-12T23:19:22+5:30
दिवसेंदिवस निवडणुकीतील उमेदवाराची जात बघून त्याला मतदान करण्याची वृत्ती मतदारांमध्ये वाढत आहे. त्यामुळे चारित्र्य संपन्न व्यक्ती निवडून येत नाही. समाजाच्या प्रत्येक घटकातील व्यक्ती निवडून आल्यास लोकशाहीचे सामाजीकरण होण्यास मदत होईल. लोकशाहीचे सामाजीकरण झाल्यास राज्यघटना बदलविण्याचा विचार करेल, असा व्यक्ती तयारच होणार नाही, असे प्रतिपादन भारीप बहुजन महासंघाचे अध्यक्ष तथा वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश (बाळासाहेब) आंबेडकर यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : दिवसेंदिवस निवडणुकीतील उमेदवाराची जात बघून त्याला मतदान करण्याची वृत्ती मतदारांमध्ये वाढत आहे. त्यामुळे चारित्र्य संपन्न व्यक्ती निवडून येत नाही. समाजाच्या प्रत्येक घटकातील व्यक्ती निवडून आल्यास लोकशाहीचे सामाजीकरण होण्यास मदत होईल. लोकशाहीचे सामाजीकरण झाल्यास राज्यघटना बदलविण्याचा विचार करेल, असा व्यक्ती तयारच होणार नाही, असे प्रतिपादन भारीप बहुजन महासंघाचे अध्यक्ष तथा वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश (बाळासाहेब) आंबेडकर यांनी केले.
चामोर्शी मार्गावरील कात्रटवार कॉम्प्लेक्स येथे रविवारी वंचित बहुजन आघाडीतर्फे संवाद यात्रा आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी अॅड. प्रकाश आंबेडकर मार्गदर्शन करीत होते. सभेला साहित्यिक लक्ष्मण माने, ेभारीप बहुजन महासंघाचे प्रदेश निरिक्षक रोहिदास राऊत, अॅड. विजय मोरे, माजी आ. हरीभाऊ बद्दे, एल. के. मडावी, अशोक खोब्रागडे, प्रा. प्रकाश दुधे, हंसराज बडोले, संदीप रहाटे, गोपाल मोगरे, डॉ. सुशील कोहाड आदी मार्गदर्शक उपस्थित होते.
पुढे बोलताना अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, मराठा समाजाचा विकास झाला असता तर त्यांना आरक्षण मागण्याची गरज पडली नसती. जागा कमी व माणसं अधिक अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. कमी असलेल्या जागा आपल्यालाच मिळाव्या, यासाठी भांडण, तंटे सुरू झाले आहेत. सत्ता उपभोगणाऱ्या मराठा नेत्यांनी आजपर्यंत मराठा समाजाच्या विकासासाठी प्रयत्न केले नाहीत. आता मात्र मराठा समाजाची त्यांच्याकडूनच दिशाभूल केली जात आहे. शासन केवळ आकडेवारी सादर करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहे. याची अनेक उदाहरणे देता येतात. राज्य शासनाने राज्यभरात १३ कोटी वृक्षांची लागवड केली. मात्र एकाही बोडक्या डोंगरावर किंवा मोकळ्या जागेत झाडे दिसत नाही. तर जेथे आधीच जंगल आहे, त्याच ठिकाणी झाडे लावण्याचा उपक्रम सुरू असल्याचे दिसून येते. त्यामुळे शासनाचा पैसा खर्च होत आहे. प्रसिध्दी मिळत आहे. मात्र प्रत्यक्षात काहीच फायदा नाही. दरवर्षी १८ लाख विद्यार्थी डिग्री घेऊन बाहेर पडतात. मात्र केवळ ६ लाख युवकांना नोकरी दिली जात आहे. काँग्रेस हा खरा विरोधी पक्ष नसून प्रादेशिक पक्ष हेच खरे विरोधी पक्ष आहेत. आधार कार्डच्या माध्यमातून केंद्र शासन नागरिकांची वैयक्तिक माहिती विदेशी कंपन्यांच्या हातात देत आहे. याचे गंभीर परिणाम देशाला भोगावे लागणार आहेत. समाजात विकृती वाढत चालली आहे.
देशातील वंचित घटाकाला सत्तेत प्रतिनिधीत्व मिळावे तसेच जात व धर्म यांच्या पलिकडे जाऊन प्रत्येक नागरिकाचा विकास व्हावा, या उद्देशाने वंचित बहुजन आघाडीची स्थापना करण्यात आली आहे, असे मार्गदर्शन अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.
उपराकार साहित्यिक लक्ष्मण माने मार्गदर्शन करताना आदिवासींना पट्टे देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, मात्र याची अंमलबजावणी होत नाही. आदिवासींच्या विकासासाठी शेकडो कोटींच्या योजना आणल्या जातात. मात्र आदिवासींची परिस्थिती आजही १० वर्षांपूर्वी जशी होती, तशीच आहे. त्यामुळे निधी गेला कुठे, असा प्रश्न उपस्थित केला.
सभेला माजी आमदार हरीभाऊ भद्दे, अॅड. विजय मोरे, एल. के. मडावी, रोहिदास राऊत, गोपाल मगरे, डॉ. सुशील कोहाड यांनी मार्गदर्शन केले. सभेला जिल्हाभरातील हजारो नागरिक उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व संचालन बाळू टेंभुर्णे यांनी केले. उपस्थितांचे आभार भावना भजगवळी यांनी मानले.
वंचितांना सत्तेकडे घेऊन जाण्यासाठी बहुजन आघाडीची स्थापना
स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही ओबीसी, भटके, विमुक्त, धनगर समाजासह बहुजनांचा विकास झाला नाही. कारण बहुजनांचा सत्ताकारणात प्रत्यक्ष सहभाग नव्हता. अशा सर्व वंचितांना सत्तेकडे घेऊन जाण्यासाठीच वंचित बहुजन आघाडीची स्थापना करण्यात आली आहे.. जेणेकरून लोकशाहीचे सामाजिकरण होऊन वंचितांना न्याय मिळेल, असे मत भारीप-बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा वंचित बहुजन आघाडीचे समन्वयक अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
वंचित बहुजन आघाडीच्या संवाद यात्रेनिमित्त ते रविवारी गडचिरोलीत आले होते. महाराष्टÑ विधानसभेच्या २८८ जागांपैकी किमान ५० जागा लहान ओबीसी व भटक्या विमुक्त समाजाला बहुजन आघाडीतर्फे दिल्या जातील.
लोकसभेच्या ४८ जागांपैकी आपण आघाडीतर्फे १२ जागा काँग्रेसला मागितल्या असून तसा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या अटीवर आम्ही काँग्रेससोबत समझोता करायला तयार आहोत, असेही अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रपरिषदेत स्पष्ट केले.