कठाणीवरील पूल बांधकामासाठी माती परीक्षणाचे काम सुरू
By admin | Published: November 9, 2014 11:19 PM2014-11-09T23:19:43+5:302014-11-09T23:19:43+5:30
शहरापासून केवळ ३ किमी अंतरावर असलेल्या कठाणी नदीवरील पूल बांधण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून नदीतील माती परीक्षणाचे काम कंत्राटदाराच्या मार्फतीने मशीनच्या सहाय्याने सुरू झाले आहे.
गडचिरोली : शहरापासून केवळ ३ किमी अंतरावर असलेल्या कठाणी नदीवरील पूल बांधण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून नदीतील माती परीक्षणाचे काम कंत्राटदाराच्या मार्फतीने मशीनच्या सहाय्याने सुरू झाले आहे.
गडचिरोली-आरमोरी मार्गावरील कठाणी नदीवरील पुलाची उंची अत्यंत कमी आहे. परिणामी पावसाळ्यात पुराचे पाणी पुलावरून वाहत राहत असल्याने वाहतूक ठप्प पडत होती. त्यामुळे सदर मार्गाची उंची वाढविण्याची मागणी अनेक वर्षांपासून नागरिकांकडून केली जात होती. यावर्षी सदर पूल बांधकामाला शासनाने हिरवी झेंडी दाखविली असून त्यासाठी १५ कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
शासनाकडून निधी प्राप्त होताच पूल बांधकामाच्या हालचालींना सुरूवात झाली आहे. पूल बांधकामाचे काम चंद्रपूर येथील एका कंपनीला देण्यात आले आहेत. या कंपनीचे कर्मचारी मशीनच्या सहाय्याने नदीतील माती व दगडांचे परिक्षण करीत आहेत. नदीच्या पात्रात ड्रिलिंग मशीन लावली आहे. सदर मशीन किती अंतरावर दगड आहे, दगड कोणत्या प्रकारचे आहे, त्याचबरोबर पात्रातील माती कशी व कोणत्या प्रकारची आहे, याचे परिक्षण केले जाणार आहे. त्यानुसार पिल्लरची खोली ठरविण्यास मदत होणार आहे. माती परिक्षणानंतर काही दिवसातच कामाला सुरूवात होणार असल्याची माहिती खोदकाम करणाऱ्या मजुरांनी दिली. (नगर प्रतिनिधी)