सौरऊर्जेवरील योजनेने पाणीटंचाईतून मुक्तता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2017 11:38 PM2017-10-08T23:38:41+5:302017-10-08T23:39:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
भामरागड : भामरागड नगर पंचायतीच्या हद्दीत बेजूर वस्ती आहे. या वस्तीपर्यंत तत्कालीन भामरागड ग्रामपंचायतीची नळ योजना पोहोचली नव्हती. शिवाय बेजूर भागात सार्वजनिक विहिरी व हातपंपाची संख्या अत्यल्प आहे. तसेच दरवर्षीच्या उन्हाळ्यात या भागात पाण्याची पातळी खालावत असल्याने पाणीटंचाईची भीषण समस्या निर्माण होत होती. या समस्येची गांभीर्याने दखल घेऊन भामरागड नगर पंचायत प्रशासनाने बेजूर भागात सौरऊर्जेवर आधारित दुहेरी पंप नळ योजना कार्यान्वित केली. त्यामुळे आता येथील नळांना दिवसभर पाणी येत आहे. परिणामी बेजूर भागातील नागरिकांची पाणीटंचाईतून मुक्तता झाली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा परिषद प्रशासनामार्फत सन २०१०-११ पासून अनेक दुर्गम व लहान गावांमध्ये पाणी सुविधेसाठी सौरऊर्जेवर चालणारी दुहेरी पंप नळ योजना कार्यान्वित करण्यात सुरुवात झाली. मोठ्या नळ योजनेच्या तुलनेत सदर दुहेरी पंप योजना कार्यान्वित करण्यास अत्यल्प खर्च येतो. तसेच देखभालीचा खर्चही अत्यल्प असतो. वीज बिलाचा प्रश्न उद्भवत नाही. त्यामुळे दुर्गम व छोट्या गावांमध्ये ग्रामपंचायतीच्या गावांमधून अशा प्रकारच्या सौरऊर्जेवरील दुहेरी पंप नळ योजना कार्यान्वित करणे अत्यंत सोयीचे ठरते. भामरागड नगर पंचायतीचे नगराध्यक्ष राजू वड्डे व बांधकाम सभापतीच्या पुढाकाराने बेजूर भागात सौरऊर्जेवरील दुहेरी पंप नळ योजना कार्यान्वित करण्यात आली. नगर पंचायतीच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातर्फे राष्टÑीय पेयजल कार्यक्रमाअंतर्गत बेजूर भागात सौरऊर्जेवर चालणारी ही नळ पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली असून आता या भागातील महिलांना नळाचे पाणी दिवसभर उपलब्ध होत आहे. परिणामी उन्हाळ्यात जाणवणारी हातपंपावरील गर्दीचे दृश्य आता दिसणार नाही.
नेलगुंडा, बोटनफुंडीतही पाणी सुविधा
४भामरागड पंचायत समितीअंतर्गत नेलगुंडा, बोटनफुंडी या लहान गावांमध्ये सौरऊर्जेवर चालणारी दुहेरी पंप नळ योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला असतानाही या योजनेच्या माध्यमातून ग्रामस्थांना पाणी उपलब्ध होत आहे. इतर ग्रामपंचायतींनी अशा योजना कार्यान्वित करण्याची गरज आहे.