स्वजल योजनेतून सौर ऊर्जेने पाणी पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 01:03 AM2018-11-28T01:03:02+5:302018-11-28T01:04:57+5:30
जिल्ह्याच्या दुर्गम भागातील विजेची समस्या आणि त्यामुळे येणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या अडचणीवर मात करण्यासाठी जिल्ह्यात सौर उर्जेवर चालणाऱ्या लघु पाणी पुरवठा योजना कार्यान्वित केल्या जाणार आहेत. ‘स्वजल’ या केंद्र सरकारच्या योजनेतून जिल्ह्याच्या सर्व तालुक्यात ही सोय करण्यास मंजुरी मिळाली आहे.
मनोज ताजने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्याच्या दुर्गम भागातील विजेची समस्या आणि त्यामुळे येणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या अडचणीवर मात करण्यासाठी जिल्ह्यात सौर उर्जेवर चालणाऱ्या लघु पाणी पुरवठा योजना कार्यान्वित केल्या जाणार आहेत. ‘स्वजल’ या केंद्र सरकारच्या योजनेतून जिल्ह्याच्या सर्व तालुक्यात ही सोय करण्यास मंजुरी मिळाली आहे.
या योजनेअंतर्गत पाणी पुरवठ्यासाठी अस्तित्वात असलेल्या बोअरवेलवर (हातपंप) सौर उर्जेवर चालणारे मोटारपंप लावून गावात पाण्याची पाईपलाईनसुद्धा टाकली जाणार आहे. राज्यातील चार आकांक्षित जिल्ह्यांमध्ये अशा पद्धतीची सोय होणार आहे. त्यापैकी वाशिम, उस्मानाबाद आणि नंदूरबार या आकांक्षित जिल्ह्यांमधील काही ठराविक तालुक्यांनाच याचा लाभ मिळणार आहे. मात्र गडचिरोली जिल्ह्यात सर्वच तालुक्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे हे विशेष. नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय, स्वयंपाक आणि इतर सुविधांसाठी तसेच जनावरांकरिता शाश्वत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी देशभरातील आकांक्षित जिल्ह्यात ही योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ग्रामसभेचा ठराव घेऊन या योजनेचे निकष पूर्ण करणाऱ्या गाव किंवा वस्तीमध्येच ही योजना मंजूर केली जाणार आहे. योजना कार्यान्वित केल्यानंतर त्याच्या देखभालीची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायत/ग्रामसभेची राहणार आहे. मात्र त्या पाईपलाईनवरून आपल्या घरात स्वतंत्र नळ कनेक्शन घ्यायचे असल्यास त्याचा खर्च संबंधित गावातील रहिवाशांना करावा लागणार आहे.
योजनेची मागणी करणारा प्रस्ताव ग्रामपंचायत किंवा ग्रामसभेकडून आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील तांत्रिक शाखेकडून या योजनेचा आराखडा तयार केला जाईल. तो मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेनंतर राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला जाईल. तेथून मान्यता मिळाल्यानंतरच ही योजना त्या गावात अंमलात आणली जाईल, असे तांत्रिक विभागाचे उपअभियंता एस.आर.माटे यांनी सांगितले. या योजनेची माहिती व जनजागृती होण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे.
असे आहेत निवडीचे निकष
स्वजल योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित गाव, वस्ती हागणदारीमुक्त असली पाहीजे. कमीत कमी १० घरांची लोकवस्ती आवश्यक, यापूर्वीची कोणतीही नळ पाणी पुरवठा योजना गावात नको. केंद्रीय भूजल बोर्ड यांचेकडून सुरक्षित ठिकाण घोषित केलेल्या स्त्रोतांवर ही योजना घेणे बंधनकारक राहणार आहे. लोकवर्गणी आणि देखभाल दुरूस्ती निधीकरिता बँकेत स्वतंत्र खाते उघडावे लागेल.
१० टक्के लोकवर्गणी आवश्यक
या योजनेत एका गावासाठी साधारणत: ५ लाखांपासून ४५ लाखांपर्यंतच्या खर्चाच्या आराखड्याला मंजुरी मिळू शकते. या खर्चात ४५ टक्के निधी केंद्र सरकारकडून तर ४५ टक्के निधी राज्य सरकार देणार आहे. याशिवाय १० टक्के रक्कम लोकवर्गणीतून गोळा करणे आवश्यक आहे. ज्या गावाची लोकवर्गणी गोळा करण्याची क्षमता नसेल त्या गावात ग्रामकोषातून किंवा आमदार-खासदार फंडातून ही रक्कम भरण्याची सोय केली जाऊ शकते.
सौर उर्जेतून चालणाऱ्या पाणी पुरवठा योजनेचा जास्तीत जास्त लाभ गडचिरोली जिल्ह्याला मिळावा यासाठी आपण केंद्र सरकारकडे मागणी केली होती. त्यामुळे या योजनेत गडचिरोली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा समावेश करण्यात आला असून त्याचा लाभ ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना निश्चितपणे होऊन त्यांची शुद्ध पाण्याची समस्या दूर होईल.
- अशोक नेते, खासदार, गडचिरोली