२२ गावांमध्ये लागले सौरदिवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 06:00 AM2020-01-18T06:00:00+5:302020-01-18T06:00:16+5:30
भामरागड, अहेरी व एटापल्ली हे तालुके आदिवासी बहुल आहेत. या तालुक्यामधील गावे घनदाट जंगलांनी व डोंगरदऱ्यांनी वेढली आहेत. त्यामुळे काही गावांमध्ये पारंपरिक वीज पोहोचविणे कठीण आहे. जिल्ह्यातील जवळपास दीडशे गावांपर्यंत अजुनही वीज पोहोचली नाही. यामध्ये प्रामुख्याने भामरागड तालुक्यातील ५४, एटापल्ली तालुक्यातील १९ व अहेरी तालुक्यातील पाच गावांमध्ये वीज पोहोचली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आदर्श मित्र मंडळ, धनकवडी पुणे व श्रीलक्ष्मी नृसिंह पतसंस्था बल्लारपूर तसेच आधार फाऊंडेशन यांच्या संकल्पनेतून गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली, अहेरी, भामरागड या तीन तालुक्यांमधील २२ गावांमध्ये सौरपथदिवे लावण्यात आले आहेत. पुन्हा जवळपास २५ गावांमध्ये अशा प्रकारचे पथदिवे लावले जातील, अशी माहिती डॉ. चरणजितसिंग सलुजा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भामरागड, अहेरी व एटापल्ली हे तालुके आदिवासी बहुल आहेत. या तालुक्यामधील गावे घनदाट जंगलांनी व डोंगरदऱ्यांनी वेढली आहेत. त्यामुळे काही गावांमध्ये पारंपरिक वीज पोहोचविणे कठीण आहे. जिल्ह्यातील जवळपास दीडशे गावांपर्यंत अजुनही वीज पोहोचली नाही. यामध्ये प्रामुख्याने भामरागड तालुक्यातील ५४, एटापल्ली तालुक्यातील १९ व अहेरी तालुक्यातील पाच गावांमध्ये वीज पोहोचली नाही. प्रत्यक्ष वीज खांब गाडून वीज पोहोचविणे कठीण असल्याने या गावांना सौरदिवे वाटप करण्याचा निर्णय घेतला. २२ गावांमध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे सौर पथदिवे लावण्यात आले आहेत. तसेच पाच शाळांमध्येही पथदिवे लावले आहेत. तसेच १ हजार १३५ कुटुंबांना सौरदिवे देण्यात आले आहेत. या उपक्रमासाठी पुणे येथील अतुल बेहरे, मंदार बोरकर, दत्तात्रय दारवटकर, विश्वनाथ परदेशी, प्रसाद साप्ते, शारदाबाई नरवा, रत्नप्रभा गिरे, राजेश गिरे, श्रीस्वामी समर्थ ब्राह्मण सेवा संघ नारायणगाव, लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट पुणे तसेच स्व. पंडीत वाघ, रूचा वैद्य, मोहन हुल्याळकर, उज्वला देशपांडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांच्या कुटुंबियांनी मदत केली, अशी माहिती डॉ. चरणजितसिंग सलुजा यांनी दिली. पत्रकार परिषदेला श्रीनिवास सुंचूवार, चेतन गायकवाड हजर होते.
ही आहेत सौरपथदिवे लागलेली गावे....
भामरागड तालुक्यातील तुमरकोठ, तोयनार, मरकनार, मुरूमभिशी, खारडी, कोरपर्शी, कुचेर, मुतेरकुई, अहेरी तालुक्यातील कचलेर, हिनभट्टी, आंबेझरा, तोंडेल, येलचिल टोला, एटापल्ली तालुक्यातील आबारपल्ली, बुर्गी, गुंडापुरी, गोसूमटोला, मासूमटोला या गावांमध्ये वीज पोहोचविण्यात आली आहे.