सफाई कामगारांच्या समस्या सोडवा
By admin | Published: June 13, 2017 12:45 AM2017-06-13T00:45:05+5:302017-06-13T00:45:05+5:30
नगर परिषदेतील रोजंदारी, कंत्राटी कामगार तसेच सफाई कामगारांच्या विविध समस्या सोडवाव्या,
मुख्याधिकाऱ्यांना निवेदन : अखिल भारतीय सफाई मजदूर कामगार संघटनेची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : नगर परिषदेतील रोजंदारी, कंत्राटी कामगार तसेच सफाई कामगारांच्या विविध समस्या सोडवाव्या, अशी मागणी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस कामगार संघटनेच्या वतीने मुख्याधिकारी कृष्णा निपाने यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. या संदर्भात नगराध्यक्षांनाही निवेदन सादर करण्यात आले आहे.
दिलेल्या निवेदनात, नगर परिषदेतील आकृतीबंधानुसार लोकसंख्येच्या आधारे ३० सफाई कामगारांची पदे मंजूर आहेत. सध्या शहरातील लोकसंख्या वाढ झाली असून सफाई कामगार त्या तुलनेत कमी पडत आहेत. २०११ च्या जनगणनेनुसार ५४ हजार १५२ एवढी लोकसंख्या गडचिरोली नगर पालिका क्षेत्रात आहे. आकृतीबंधानुसार १ हजार लोकसंख्येच्या मागे एक सफाई कामगार असणे आवश्यक आहे. त्यानुसार २४ नवीन सफाई कामगारांची पदनिर्मिती करून सदर पदे भरावी, नगर परिषदेत कार्यरत सफाई कामगारांना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार त्यांना पदोन्नती द्यावी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेच्या शासन निर्णयानुसार सफाई कामगारांच्या पात्र वारसदारांना मालकी तत्त्वावर सदनिका मिळवून द्यावी, रोजंदारी कर्मचाऱ्यांना कामगार आयुक्तांच्या निर्देशानुसार मंजूर ८ हजार ४३८ रूपये प्रतिमाह वेतन द्यावे, रोजंदारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या ईपीएफ संदर्भातील माहिती उपलब्ध करून द्यावी, रोजंदारी, कंत्राटी सफाई कामगारांचे आर्थिक, शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने त्यांच्या समस्यांचा विचार करून समस्या सोडवाव्या, अशी मागणी अखिल भारतीय सफाई मजदूर संघटनेच्या वतीने नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदन देताना संघटनेचे जिल्हाध्यक्ष छगन महातो व सफाई कामगार संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.