एटापल्लीतील समस्या सोडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 12:19 AM2017-09-04T00:19:08+5:302017-09-04T00:23:14+5:30
एटापल्ली तालुक्याच्या विकासाकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे तालुक्याचा विकास रखडला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : एटापल्ली तालुक्याच्या विकासाकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे तालुक्याचा विकास रखडला आहे. मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष घालावे, अशी मागणी भारतीय राष्टÑीय काँग्रेस, तालुका शाखा एटापल्लीच्या वतीने तहसीलदारांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
एटापल्ली हा जंगलव्याप्त व आदिवासी बहुल तालुका आहे. आदिवासी नागरिकांच्या विकासासाठी अनेक योजना आहे. मात्र या योजनांची अंमलबजावणी केली जात नाही. तालुक्यात सिंचनाच्या सुविधा उपलब्ध नाही. या तालुक्यात प्रामुख्याने धानाचे उत्पादन घेतले जाते. मात्र सिंचन सुविधा उपलब्ध नसल्याने रोवलेले पीक हातात येईल, याची शाश्वती नाही. केंद्र व राज्य शासन शेतकºयांसाठी अनेक योजना राबवित असल्याचे सांगत असले तरी येथील अनेक शेतकरी कृषी विभागाच्या योजनांपासून वंचित आहेत. सततची नापिकी व दुष्काळामुळे शेतकरी वैतागून केला आहे. काही शेतकºयांनी आत्महत्येचाही मार्ग अवलंबला आहे. रोजगाराचे साधन उपलब्ध नसल्याने येथील युवकांना बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. केंद्र व राज्य शासन तालुक्याच्या विकासाकडे लक्ष घालावे, अशी मागणी निवेदनातून केली आहे. निवेदन देतेवेळी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. एटापल्ली तालुक्यातील समस्यांबाबत काँग्रेसच्या सभेत चर्चा झाली.