ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडवा
By Admin | Published: May 29, 2016 01:42 AM2016-05-29T01:42:39+5:302016-05-29T01:42:39+5:30
ज्येष्ठ नागरिकांच्या अनेक समस्या आहेत. सदर समस्यांसह शेतकऱ्यांच्याही समस्या मार्गी लावाव्या,
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : मुख्यमंत्र्यांकडे मागणी; शेतकऱ्यांच्या समस्यांवर लक्ष वेधले
गडचिरोली : ज्येष्ठ नागरिकांच्या अनेक समस्या आहेत. सदर समस्यांसह शेतकऱ्यांच्याही समस्या मार्गी लावाव्या, अशी मागणी ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
ज्येष्ठ नागरिकांनी दिलेल्या निवेदनात, ज्येष्ठांचे वय ६५ ऐवजी ६० वर्ष करण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. १ एप्रिल २०१६ पासून अंमलबजावणी करण्याची मागणी केली. परंतु अंमलबजावणी अद्यापही झाली नाही. सदर अंमलबजावणी करावी, एस. टी. महामंडळाची २ हजार ८०० कोटी रूपयांची थकबाकी महामंडळाला अदा करावी, ६० वर्षावरील अल्प, अत्यल्प भूधारक शेतकरी, शेतमजूर व कामगारांना १ हजार ५०० रूपये मासिक पेंशनही मंजूर करावी, ज्येष्ठ नागरिकांना, आर्थिक दुर्बल व्यक्तींना शासकीय रूग्णालयातून, मेडिकल स्टोअर्समधून अत्यल्प दराने जेनेरिक औषधांचा पुरवठा करावा, अधिकाधिक जेनेरिक मेडिकल स्टोअर्स उघडण्यास मंजुरी द्यावी, बँक व पोस्ट आॅफिसमध्ये ज्येष्ठांसाठी स्वतंत्र खिडकी असावी, दारिद्र्य रेषेची मर्यादा २१ हजारावरून ४० हजार करावी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या, राजीव गांधी आरोग्यदायी योजना उत्पन्नाची अट न ठेवता सर्वांना लागू करावी, ज्येष्ठ नागरिकांसाठी जिल्हा व तालुकास्तरावर समाजभवन व विरंगुळा केंद्रासाठी निधीची तरतूद करावी, ज्येष्ठ नागरिक भवनासाठी न. प. व ग्रा. पं. ने मोकळी जागा उपलब्ध करावी, ओबीसींचे आरक्षण पूर्ववत २७ टक्के करावे. ज्या गावात ओबीसी ५१ टक्केपेक्षा जास्त आहेत अशा गावातील पेसा रद्द करावा, स्वतंत्र विदर्भाची निर्मिती करावी, शेतकऱ्यांना विनामूल्य सिंचनाची सोय करावी आदी मागण्यांचा समावेश होता.
निवेदन देताना संस्थाध्यक्ष दत्तात्रेय बर्लावार, पांडुरंग घोटेकर, देवाजी सोनटक्के, बापुजी होकम, ब्राह्मणवाडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)