शिक्षकांच्या समस्या सोडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 12:12 AM2018-07-13T00:12:03+5:302018-07-13T00:12:36+5:30
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा शाखा गडचिरोलीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड यांची भेट घेऊन शिक्षकांच्या समस्यांबाबत चर्चा केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा शाखा गडचिरोलीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड यांची भेट घेऊन शिक्षकांच्या समस्यांबाबत चर्चा केली. या समस्या निकाली काढाव्या, अशी मागणी केली.
बदली झालेल्या शिक्षकांचे अंतिम वेतन प्रमाणपत्र कार्यारत पंचायत समितीला त्वरित पाठवावे, १५ टक्के प्रोत्साहन भत्ता सहाव्या वेतन आयोगानुसार लागू करून थकबाकी त्वरित द्यावी, बरेच शिक्षक अजूनही स्थायी झाले नाहीत. याबाबत कार्यवाही करावी, १२ वर्ष सेवा झालेल्या शिक्षकांना चटोपाध्याय व २४ वर्ष सेवा झालेल्या शिक्षकांना निवड श्रेणी लागू करावी, शालेय प्रभार सेवा ज्येष्ठ शिक्षकांना सोपविण्यात यावा याबाबतचे निर्देश पंचायत समितीला द्यावे, या मागण्यांचे निवेदन प्राथमिक शिक्षक संघाने मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले. या समस्यांवर चर्चा केली.
शासन निर्णयाप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्याबाबत पत्र काढले जाईल, तसेच इतरही समस्या सोडविण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले. शिष्टमंडळात संघाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद कावडकर, किशोर कोहळे, धनेश कुकडे, शीला सोमनकर, बावनथडे, रघुनाथ भांडेकर, मारोती वनकर, आशिष धात्रक, सुरेश वासलवार, राजेश चिलमवार, पुरूषोत्तम किरमे, किशोर कस्तुरे यांच्यासह प्राथमिक शिक्षक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.