सोमनूर पर्यटनस्थळ उपेक्षितच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:18 AM2021-09-02T05:18:17+5:302021-09-02T05:18:17+5:30
भ्रमणध्वनी सेवा विस्कळीत सिरोंचा : तालुक्यातील आसरअल्ली परिसरात सात ते आठ गावांचा समावेश आहे. परंतु या भागातील बीएसएनएल कव्हरेज ...
भ्रमणध्वनी सेवा विस्कळीत
सिरोंचा : तालुक्यातील आसरअल्ली परिसरात सात ते आठ गावांचा समावेश आहे. परंतु या भागातील बीएसएनएल कव्हरेज व इंटरनेट सेवा वारंवार विस्कळीत होत असल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. अंकिसा परिसरातील लक्ष्मीदेवीपेठा, बालमुत्त्यमपल्ली, कंबालपेठा, राघवरावनगर, जंगलपल्ली, गेर्रेपल्ली आदी गावे येतात. वारंवार मागणी करूनही सेवेत सुधारणा झाली नाही.
तलाव सौंदर्यीकरणाचा प्रश्न थंडबस्त्यात
गडचिरोली : गोकुळनगरलगतच्या तलावाच्या सौंदर्यीकरणाचे काम काही वर्षांपूर्वी प्रशासनाच्या वतीने हाती घेण्यात आले होते. मात्र सौंदर्यीकरणाचे काम १०० टक्के पूर्ण झाले नाही. तलाव सौंदर्यीकरणाचा प्रश्न थंडबस्त्यात असल्याचे दिसून येत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हा प्रश्न थंडबस्त्यात आहे.
औद्योगिक वसाहतीचे काम रखडले
धानोरा : छत्तीसगड सीमेला लागून असलेल्या धानोरा तालुका मुख्यालयात औद्योगिक वसाहत निर्माण करण्याचा निर्णय आघाडी सरकारने घेतला होता. मात्र याबाबत अंमलबजावणी करण्यात आली नाही. त्यामुळे औद्योगिक वसाहतीचे काम थंडबस्त्यात पडले आहे.
अनेक प्रशासकीय इमारती जीर्णावस्थेत
अहेरी : तालुका मुख्यालयातील अनेक प्रशासकीय इमारती जीर्णावस्थेत आल्या आहेत. तरीही याच इमारतींमधून प्रशासकीय कारभार चालविला जात आहे. मात्र अद्यापही नवीन इमारत बांधण्यात आलेल्या नाहीत. तालुकास्तरावरील अनेक कार्यालयाच्या इमारती दुरवस्थेत आहेत.
पिशव्यांवरील बंदी कागदोपत्रीच
गडचिरोली : शासनाने प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदीचे आदेश जारी केले आहेत. परंतु ही बंदी केवळ कागदावरच दिसून येत आहे. ५० मायक्रॉन जाडीपेक्षा कमी व ८ ते १२ इंच उंचीपेक्षा लहान आकाराची प्लॅस्टिक पिशवी वापरणे व उत्पादनावर बंदी घालण्यात आली आहे. संबंधितांवर कारवाई करावी.
हनुमान मंदिरात सुविधांचा अभाव
आरमोरी : तालुक्याच्या वडधा परिसरातील गणपूर येथील हनुमान मंदिर देवस्थान विकासापासून वंचित आहे. येथील मंदिराचा विकास साधावा, अशी मागणी परिसरातील भाविकांनी केली आहे. वडधापासून तीन किमी अंतरावर असलेल्या गणपूर येथे जंगल परिसरात हनुमान मंदिर आहे. वर्षभर भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. येथे हातपंप नसल्याने भाविकांना विहिरीचे पाणी काढावे लागते. त्याचबरोबर अन्य सोयी-सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे शासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी या भागातील भाविकांनी केली आहे.
रोजगारासाठी मजुरांचे छत्तीसगडमध्ये स्थलांतर
गडचिरोली : ग्रामीण भागातील शेतकरी व शेतमजुरांना काम मिळणे बंद झाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील अल्पभूधारक शेतकरी व शेतमजूर कामासाठी छत्तीसगड व तेलंगणा राज्यात स्थलांतर करीत आहेत. सदर मजूर तेंदुपत्ता तोडण्याचा हंगाम सुरू होईपर्यंत परतणार नाहीत. गोदावरी नदीवर पूल झाल्याने तेलंगणात स्थलांतरित होणाऱ्या मजुरांची संख्या वाढली आहे.
दुर्गम गावांतील रस्ते खड्डेमय
भामरागड : तालुका मुख्यालयापासून १८ किमी अंतरावरील लाहेरी गावाकडे येणारा रस्ता अत्यंत खड्डेमय झाला आहे. हिंदेवाडा ते लाहेरी या मार्गाची दुरवस्थाही अनेक दिवसांपासून झाली आहे. रस्त्याची पक्की दुरुस्ती अजूनही करण्यात आली नाही.