मातृदिनाला पुत्रशोक, चार तरुणांचा बुडून मृत्यू; एकाला वाचविताना चौघांनी गमावला जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2023 09:03 PM2023-05-14T21:03:27+5:302023-05-14T21:03:47+5:30
चामोर्शी गावावरवर शोककळा.
लोमेश बुरांडे/चामोर्शी (जि.गडचिरोली) : हॉटेलात जेवण करुन पाच मित्र पोहण्यासाठी तलावात उतरले,यावेळी खोल पाण्यात एक मित्र बुडत असल्याचे पाहून चौघे धावले. बुडत असलेल्या मित्राला वाचवले, पण नंतर ते चौघेही बुडाले. १४ मे रोजी सर्वत्र मातृदिन साजरा होत असताना चामोर्शी शहरात ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेने संपूर्ण शहरावर शोककळा पसरली.
प्रफुल्ल विठ्ठल येलुरे (वय २०), महेश मधुकर घोंगडे (वय २०), शुभम रुपचंद लांजेवार (वय २४, तिघेही रा. प्रभाग क्र. ४ आशासदन टोली ,चामोर्शी), मोनू त्रिलोक शर्मा (वय २६, रा. गडचिरोली) अशी मयतांची नावे आहेत. हर्षल धोडरे (२२,रा.चामोर्शी) हा बालंबाल बचावला. हे पाचही जण मित्र होते.
रविवारी सुटीच्या निमित्ताने ते दुपारी एकत्रित आले. चामोर्शी शहराजवळील एका हॉटेलात त्यांनी जेवण केले. उन्हामुळे गरमी होऊ लागल्याने त्यांनी चिचडोह बंधाऱ्यात पाेहण्याचे ठरवले. त्यानुसार, पाचही जण पाण्यात उतरले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने हर्षल धोडरे हा बुडू लागला, त्याच्या मदतीसाठी इतर चौघेही धावले. त्यांनी हर्षलला वाचविले, पण त्यानंतर चौघेही बुडाले. बुडताना वाचल्याने हर्षलला धाप लागली होती. जवळ इतर कोणी नसल्याने त्यांच्या मदतीला मात्र कोणी धावू शकले नाही.
नाकातोंडात पाणी गेल्याने चौघांचाही बुडून मृत्यू झाला. दरम्यान, माहिती मिळताच चामोर्शी ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेश खांडवे , उपनिरीक्षक सुधीर साठे , तुषार पाटील व अंमलदार यांनी धाव घेतली. मात्र, पोलिसांचे प्रयत्न निष्फळ ठरले.
नातेवाईकांच्या आक्रोशाने गहिरवले शहर
या घटनेनंतर बंधाऱ्याजवळ नागरिकांनी तोबा गर्दी केली. चार तरुण मित्रांचे एका शेजारी मृतदेह ठेवले हाेते. हा प्रसंग हृदय पिळवटून टाकणारा होता. त्यानंतर चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीवेळी कुटुंबीय व नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. त्यामुळे उपस्थितांनाही गहिवरुन आले. संपूर्ण शहर शोकसागरात बुडाले होते. आमदार डॉ.देवराव होळी यांनी रुग्णालयात धाव घेऊन कुटुंबीयांना धीर देण्याचा प्रयत्न केला.