सोनापुरात खोडकिडीने धानपीक केले फस्त
By admin | Published: November 19, 2014 10:38 PM2014-11-19T22:38:30+5:302014-11-19T22:38:30+5:30
चामोर्शी तालुका मुख्यालयापासून ६ किमी अंतरावर असलेल्या सोनापूर या गावातील अनेक शेतकऱ्यांच्या धानपिकावर खोडकिडा, मानमोडी व पांढरा पिसवा या रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे.
चामोर्शी : चामोर्शी तालुका मुख्यालयापासून ६ किमी अंतरावर असलेल्या सोनापूर या गावातील अनेक शेतकऱ्यांच्या धानपिकावर खोडकिडा, मानमोडी व पांढरा पिसवा या रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. हातात आलेले धानपिकावर रोगाने हल्ला चढविल्यामुळे या गावातील शेतकरी पुरते हवालदिल झाले आहे. शासनाने सर्व्हेक्षण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी या गावातील शेतकऱ्यांनी केली आहे.
सोनापूर येथील शेतकरी श्रावण दुधबावरे यांच्या सर्व्हे नं. ११० मधील ०.६२ हेक्टर आर, सर्व्हे नं. १११ मधील ०.४७ व सर्व्हे नं. ११५ मधील ०.३८ हेक्टर आर क्षेत्रात यंदाच्या खरीप हंगामात संकरित धानपिकाची लागवड केली. या धानपिकावर तिनदा रोगांचे आक्रमण झाले. त्यामुळे शेतकरी श्रावण दुधबावरे यांनी तिनवेळा कीटकनाशक औषधांची धानपिकावर फवारणी केली. मात्र या कीटकनाशक औषधांचा १०० टक्के उपयोग झाला नाही. त्यामुळे शेतातील धानपीक हातात येण्याच्या उंबठ्यावर पुन्हा खोडकिड, मानमोडी व पांढरा पिसवा या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला. यामुळे धान उत्पादनात कमालीची घट होणार असल्याचा अंदाज शेतकरी श्रावण दुधबावरे याने लोकमत प्रतिनिधीकडे व्यक्त केला.
रोगामुळे धानपिकाच्या लोंबावर मोठा परिणाम होतो. रोगामुळे धान कापणीच्या पूर्वीच धानाचे लोंब गळून पडतात. त्यामुळे धान्य सडते. रोगामुळे धान्य वजनाने हलके होतात. परिणामी अशा धानाला योग्य भाव मिळत नाही, असेही शेतकरी दुधबावरे यांनी यावेळी सांगितले. सोनापूर गावातील धानपिकावर मोठ्या प्रमाणात रोगांचा प्रादुर्भाव झाल्याची परिस्थिती येथील सरपंच गयाबाई सिडाम यांनी तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी व तलाठ्यांना कथन केली. तसेच तत्काळ या धानपिकाचे सर्व्हेक्षण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्याची मागणी त्यांनी अधिकाऱ्यांकडे केली आहे. (शहर प्रतिनिधी)