सोनार समाजाने तंत्रज्ञानाची कास धरावी
By admin | Published: February 28, 2016 01:25 AM2016-02-28T01:25:37+5:302016-02-28T01:25:37+5:30
सोने, चांदी यांच्यापासून आकर्षक दागिणे तयार करण्यासाठी अनेक नवीन यंत्रसामग्री व तंत्रज्ञान निर्माण झाले आहे. कल्पकता वापरून दागिने तयार केल्यास त्याला चांगली किमत मिळते.
खासदारांचे प्रतिपादन : संत शिरोमणी नरहरी महाराज पुण्यतिथी सोहळा
गडचिरोली : सोने, चांदी यांच्यापासून आकर्षक दागिणे तयार करण्यासाठी अनेक नवीन यंत्रसामग्री व तंत्रज्ञान निर्माण झाले आहे. कल्पकता वापरून दागिने तयार केल्यास त्याला चांगली किमत मिळते. त्यामुळे व्यवसाय करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सोनार समाजाने वापर करावा. चोरीचा माल खरेदी केल्यास संबंधित दुकानदारावर अजामीनपात्र गुन्हा दाखल केल्या जातो. यामध्ये शिथीलता आणून जामीनपात्र गुन्हा ठरविण्यासाठी आपण प्रयत्न करू. समाज मंदिर बांधण्यासाठी जागा निश्चित करावी, त्यासाठी आपण आवश्यक तेवढा निधी देऊ, असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी केले.
सोनार समाज सेवा संस्था गडचिरोलीच्या वतीने शनिवारी श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते विशेष अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोनार सेवा संस्थेचे अध्यक्ष सत्यवान खरवडे, भाजपा शहर अध्यक्ष सुधाकर येनगंधलवार, सेवानिवृत्त मुख्याध्यापक चांगदेव काळबांधे, पं.स. सदस्य चांगदेव फाये, रमेश भरणे, यादवराव खरवडे, दिनकर भरणे, सुधाकर खरवडे, शिंगणे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, संत शिरोमणी नरहरी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन, नृत्य स्पर्धा, गायन स्पर्धा, उपवर-वधू परिचय मेळावा, स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. प्रास्ताविक सचिव दत्तात्रय खरवडे, संचालन अरूण पोगळे तर आभार संस्थेच्या उपाध्यक्ष संध्या पोगळे यांनी मानले. या कार्यक्रमादरम्यान खासदार अशोक नेते यांना समाजाच्या विविध प्रश्नांचे निवेदन देण्यात आले. (नगर प्रतिनिधी)