वेळेवर उपचार न मिळाल्याने गेला बाळंतीणीचा जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 01:10 AM2018-05-16T01:10:46+5:302018-05-16T01:10:46+5:30
तालुक्यातील कमलापूर प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या मांडरा येथील १५ दिवसांपूर्वी बाळंतीण झालेल्या एका महिलेचा वेळेवर योग्य उपचार मिळू न शकल्याने सोमवारी रात्री मृत्यू झाला. सुशीला राकेश सिडाम असे या महिलेचे नाव आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : तालुक्यातील कमलापूर प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या मांडरा येथील १५ दिवसांपूर्वी बाळंतीण झालेल्या एका महिलेचा वेळेवर योग्य उपचार मिळू न शकल्याने सोमवारी रात्री मृत्यू झाला. सुशीला राकेश सिडाम असे या महिलेचे नाव आहे.
सुशीला ही अहेरी तालुक्यातील व्यंकटापूर येथील मूळ रहिवासी होती. तिचा विवाह याच तालुक्यातील मांडरा येथील राकेश सिडामसोबत झाला होता. बाळंतपणासाठी ती आपल्या मूळ गावी व्यंकटापूर येथे आली होती. २१ एप्रिल रोजी तिचे घरीच बाळंतपण झाले. नंतर अहेरी उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर तिला २५ एप्रिल रोजी सुटी देण्यात आली.
दरम्यान सुशिला सासरी पोहोचल्यानंतर तिच्या शरीरातील रक्ताच्या प्रमाणात कमतरता येऊ लागली. तिचे हिमोग्लोबिन ४ ग्रॅमवर आले. तब्येत खालावत असल्याची माहिती सुशीलाच्या सासरच्या मंडळीने गावातील आशा वर्करकडे दिली, मात्र तिच्याकडे पुरेशे साहित्य नसल्याचे तिने सांगितले. सुशीलाचा पती यावेळी छत्तीसगड राज्यात मजुरीसाठी गेला होता. तब्येत अत्यंत खालावत असल्याची माहिती सुशीलाचे भाऊजी लबंना तलांडे यांना मिळाल्यानंतर त्यांनी मांडरा गाव गाठले.
सुशीलाला अहेरी उपजिल्हा रु ग्णालयात नेण्यासाठी रु ग्णवाहिकेची गरज होती. पण अनेक प्रयत्न करूनही रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. अखेर एका खाजगी वाहनातून सोमवार दि.१४ मे रोजी सुशीलाला अहेरी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी तिला रक्त चढविण्यात आले. अहेरीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कन्ना मडावी, डॉ.अमोल पेशट्टीवार तथा नर्सेस यांनी सुशीलाला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पण प्रकृती जास्तच खालवल्याने तिला गडचिरोली जिल्हा रु ग्णालयात पाठविण्यात आले. मात्र वाटेतच सुशीलाचा मृत्यू झाला.
वेळेवर आरोग्य कर्मचाऱ्यांनी सुशीलाची तपासणी केली असती तर तिचा जीव वाचला असता. दोन दिवसांपूर्वीच रुग्णवाहिका न मिळाल्याने कमलापूर प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत नवजात बाळाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना एका बाळांतीण महिलेचा मृत्यू झाला.
कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष, पुजाऱ्याकडे उपचार
यादरम्यान सुशीला व तिच्या नवजात मुलीची आरोग्य कर्मचाऱ्यांकडून योग्य ती काळजी घेणे आवश्यक होते. मात्र मांडरा येथील आरोग्य सेविका मागील दिड वर्षांपासून सतत गैरहजर आहे. तसेच एनआरएचएमअंतर्गत येत असलेली एएनएम संपावर आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या कोणत्याच कर्मचाराऱ्याने किंवा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सुशीला व तिच्या नवजात मुलीची तपासणी केली नाही. त्यामुळे गावातील पुजाऱ्याकडे तिचे उपचार करण्यात आल्याची माहिती आहे.