रूग्णालयात अत्याधुनिक सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 01:27 AM2018-04-14T01:27:06+5:302018-04-14T01:27:06+5:30
इंदिरा गांधी चौकातील १०० खाट क्षमता असलेल्या महिला व बाल रूग्णालयात अत्याधुनिक सोयीसुविधा राहणार आहेत. महिला रूग्णालयात सेंट्रल क्लिनिकल लेबॉरटरी असणार आहे. अशा प्रकारची लेबॉरटरी असलेले राज्यातील पहिलेच रूग्णालय आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : इंदिरा गांधी चौकातील १०० खाट क्षमता असलेल्या महिला व बाल रूग्णालयात अत्याधुनिक सोयीसुविधा राहणार आहेत.
महिला रूग्णालयात सेंट्रल क्लिनिकल लेबॉरटरी असणार आहे. अशा प्रकारची लेबॉरटरी असलेले राज्यातील पहिलेच रूग्णालय आहे. या ठिकाणी महिलांच्या गर्भाशयाच्या कर्करोगाचे निदान करता येईल, असे काल्पोस्कोपी हे यंत्र बसविण्यात आले आहे. त्याचबरोबर सिव्हेज ट्रिटमेंट प्लान्ट, सोलर वॉटर हिटर, रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा असल्याने एक प्रकारची हे पर्यावरण अनुकूल ग्रीन हॉस्पीटल ठरले आहे. ५ डिसेंबर २०१० रोजी तत्कालीन पालकमंत्री आर. आर. पाटील यांच्या हस्ते इमारतीचे भूमीपूजन झाले.
इमारतीचे बांधकाम एकूण ८४७१.९८ चौरस मीटर क्षेत्रात असून यासाठी १८ कोटी ७७ लाख ९ हजार रूपये एवढा खर्च आला आहे. या रूग्णालयात एकूण ६६ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ५७ पदे भरली आहेत. यामध्ये एक स्त्री रोग व प्रसुतीतज्ज्ञ, दोन बधिरीकरण तज्ज्ञ, दोन बाल रोगतज्ज्ञ व एक क्ष-किरण तज्ज्ञ राहणार आहेत. इतर आठ वैद्यकीय अधिकारी राहतील. वर्ग ३ ची पाच व वर्ग ४ ची २४ पदे बाह्य यंत्रणेमार्फत भरण्यात येतील.
नियोजन विभागासाठी प्रशस्त इमारत
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात नियोजन भवन बांधण्यात आली आहे. इमारत उभारणीसाठी ६ कोटी ६५ लाख २६ हजार रूपये खर्च आला आहे. इमारत दोन मजली असून एकूण ११२८.६९ चौरस मीटरमध्ये बांधकाम आहे. पहिल्या मजल्यावर अध्यावत असे १५० आसन क्षमतेचे सभागृह आहे. संपूर्ण सभागृह साऊंडप्रुफ असून त्यात तीन प्रोजेक्टर आहेत. पहिल्या मजल्यावर व्हीआयपी कक्ष, नियोजन अधिकारी यांचे कक्ष आहे. मुख्य इमारतीचे बांधकाम १५ महिन्यात पूर्ण झाले. सजवाटीसाठी १ कोटी ७६ लाखांचा खर्च झाला आहे.