कापसामुळे घटले ज्वारी पिकाचे क्षेत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:36 AM2021-04-10T04:36:15+5:302021-04-10T04:36:15+5:30
महागाव (बु.) : गडचिरोली जिल्ह्यात १५-२० वर्षांपूर्वी ज्वारी पिकाची लागवड अनेक शेतकरी करीत हाेते. ज्वारीचा वापर भाकरी व ...
महागाव (बु.) : गडचिरोली जिल्ह्यात १५-२० वर्षांपूर्वी ज्वारी पिकाची लागवड अनेक शेतकरी करीत हाेते. ज्वारीचा वापर भाकरी व आंबिल तयार करण्यासाठी केला जात हाेता. परंतु अलीकडे नगदी पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढल्याने व वावरांचे रूपांतर धानपिकाच्या शेतीत झाल्याने ज्वारी लागवडीचे क्षेत्र घटले. त्यामुळे आता आंबिल पिणाऱ्या लाेकांनाही महागडी ज्वारी दुकानातून खरेदी करावी लागत आहे. अहेरी तालुक्यातील अनेक शेतकरी ज्वारीची लागवड करीत हाेते. परंतु गेल्या तीन वर्षात या भागातील शेतकऱ्यांनी कापूस लागवडीवर अधिक भर दिला. त्यामुळे ज्वारीच्या पिकाकडे शेतकऱ्यांनी आपसूकच पाठ फिरवली. कापूस हे नगदी पीक असल्याने मागील दोन ते तीन वर्षात ज्वारीकडे शेतकऱ्यांचे दुर्लक्ष झाले. या भागात सध्या ज्वारीचे पीक माेजकेच शेतकरी घेत असल्याचे दिसून येते. ज्वारीची आंबिल शरीरात योग्य प्रमाणात तापमान ठेवण्यास मदत करते व आराेग्याच्या दृष्टीनेसुद्धा महत्त्वाची आहे, ही बाब ओळखून अनेकजण आंबिल पितात. परंतु आता शेतकरी ज्वारीचे पीक घेणे बंद केल्यामुळे ज्वारीच्या किमतीत दुप्पट वाढ झाली आहे. २०२०-२१ या वर्षासाठी केंद्र शासनाने संकरित ज्वारीला दोन हजार ६२० व मालदांडी ज्वारीला दोन हजार ६४० रुपये आधारभूत दर जाहीर केला आहे. खुल्या बाजारात सध्या ४० ते ५० रुपये किलोप्रमाणे ज्वारीची विक्री केली जात आहे. धानापेक्षा ज्वारीला अधिक भाव आहे. परंतु कृषी विभागाच्या मार्गदर्शनाअभावी अहेरी तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकरी ज्वारीची लागवड करीत नसल्याने अनेक गावांमधील क्षेत्र दिवसेंदिवस घटत आहे.
बाॅक्स
देवलमारी परिसरातील लागवड क्षेत्र कायम
अहेरी तालुक्यात माेजकेच शेतकरी ज्वारीची लागवड करतात. तालुक्यात देवलमारी, अवलमरी, व्यंकटापूर, वट्रा व परिसरातील काही गावांमधील शेतकरी नदीकाठालगत ज्वारीचे पीक घेतात. परंतु ज्वारी विक्रीसाठी बाजारपेठ तसेच ग्राहकांची अल्प मागणी यासह विविध कारणांमुळे ज्वारी लागवडीकडे शेतकरी पाठ दाखवित आहेत. हीच स्थिती पुन्हा कायम राहिल्यास येत्या पाच वर्षात जिल्ह्यातील ज्वारी लागवडीचे क्षेत्र पुन्हा झपाट्याने घटण्याची शक्यता नाकारता येत नाही.