पुतळा विटंबना करणाऱ्याला क्षमादान
By admin | Published: August 13, 2015 12:29 AM2015-08-13T00:29:43+5:302015-08-13T00:29:43+5:30
येथील वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्याची तोडफोड करून विटंबना करणाऱ्या इसमास गुरूदेव भक्तांनी मोकळ्या मनाने क्षमा केली.
रांगी : येथील वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्याची तोडफोड करून विटंबना करणाऱ्या इसमास गुरूदेव भक्तांनी मोकळ्या मनाने क्षमा केली. तसेच सदर इसमास दररोज राष्ट्रसंतांची ग्रामगीता वाचनाची व व्यसनाचा त्याग करण्याची अनोखी शिक्षा सुनावली. दरम्यान, गुरूदेवभक्तांनी सदर इसमांकडून प्रतिज्ञा वदवून घेतली.
रांगी येथील ग्राम पंचातयीच्या प्रवेशद्वारासमोर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. अज्ञात इसमाने या पुतळ्याची तोडफोड केली होती. दुसऱ्या दिवशी ही घटना निदर्शनास आल्यानंतर गावामध्ये संतापाची लाट उसळली होती. मात्र गुरूदेव सेवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी संयम बाळगला होता. पुतळ्याची विटंबना करणाऱ्या अज्ञात इसमाविरोधात गुरूदेव भक्तांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी संबंधित इसमावर गुन्हा दाखल केला. यासंदर्भात पोलिसांनी संशयीत आरोपीची चौकशी केली. दरम्यान मंगळवारी रांगी येथील ग्रा. पं. कार्यालयात सभा आयोजित करण्यात आली. या सभेला अखिल भारतीय गुरूदेव सेवा मंडळ गुरूकुंजा आश्रम मोझरीचे उपसर्वाधिकारी रूपराव वाघ, राजकुमार जयस्वाल, गुरूदेव सेवा मंडळाचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिवनाथ कुंभारे, प्रा. भाऊराव पत्रे, दलित मित्र नानाजी वाढई, गुरूदेव सेवामंडळाचे सचिव पंडीत पुडके, सुधीर धकाते, सरपंच जगदीश कन्नाके, माजी पं. स. सदस्य शशिकांत साळवे, प्रकाश महाराज काटेंगे, तंमुस अध्यक्ष श्यामराव बोरसरे, विश्वनाथ चापडे, हरी वालदे, शालीक भोयर, महेंद्र बैस, के. जी. नेवारे, नामदेव गेडाम आदी उपस्थित होते.
याप्रसंगी राष्ट्रसंतांच्या पुतळ्याची तोडफोड करणारा संशयीत आरोपी दादाजी संभाजी टिंगुसले रा. रांगी याला हजर करण्यात आले. पदाधिकाऱ्यांनी त्याची चौकशी केली असता, त्याने आपला गुन्हा कबुल केला. गुरूदेव सेवामंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडे दादाजी टिंगुसले याने क्षमायाचना केली. यावेळी त्याला ग्रामगीता भेट देऊन दररोज ग्रामगीतेचे वाचन करण्यास सांगण्यात आले. सर्व व्यसने सोडून देण्याची प्रतिज्ञा त्याच्याकडून वदवून घेण्यात आली. गुरूदेव सेवामंडळाच्या पदाधिकारी व गुरूदेव भक्तांनी त्याला उदार अंत:करणाने क्षमा केल्यामुळे जनमानसावर याचा सकारात्मक परिणाम झाला आहे.
थोर पुरूष अथवा देवी, देवतांच्या पुतळ्याच्या विटंबना प्रकरणी संतप्त नागरिक तावडीत सापडलेल्या आरोपीला मारहाण करतात. मात्र असे काही न करता गुरूदेव भक्तांनी या प्रकरणातील आरोपीला माफ केले.