दक्षिण गडचिरोलीत पुरामुळे हाहाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2022 05:00 AM2022-07-10T05:00:00+5:302022-07-10T05:00:16+5:30
दक्षिण भागातील भामरागड, सिरोंचा, अहेरी, एटापल्ली या तालुक्यांमध्ये गेल्या २४ तासांत जोरदार पाऊस बरसला. त्यामुळे सर्वच नाल्यांसह मोठ्या नद्यांनाही पूर आला. त्यातच गोसीखुर्द धरणाचे ११ गेट उघडण्यात आले. चिचडोह बॅरेजचेही सर्व ३८ गेट उघडे असून पावसामुळे त्यातील विसर्गही वाढला आहे. त्यामुळे काही प्रमुख नद्या आणि उपनद्यांची पाणीपातळी वाढली.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्याच्या दक्षिण भागातील तालुक्यांमध्ये शनिवारी सर्वत्र पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. मोठ्या नद्यांसह नाल्यांचे पाणी पुलावरून वाहत असल्याने काही प्रमुख मार्गांसह दुर्गम भागातील अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. काही गावांमधील वीजपुरवठाही खंडित झाला आहे. पुराचे पाणी गावात शिरल्यामुळे काही गावेही जलमय झाली आहेत. दरम्यान, पेरमिलीजवळ एक लाईनमनचा नाल्याच्या पुरात बुडून मृत्यू झाला आहे. याशिवाय पुरात अडकलेल्या काही लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.
दक्षिण भागातील भामरागड, सिरोंचा, अहेरी, एटापल्ली या तालुक्यांमध्ये गेल्या २४ तासांत जोरदार पाऊस बरसला. त्यामुळे सर्वच नाल्यांसह मोठ्या नद्यांनाही पूर आला. त्यातच गोसीखुर्द धरणाचे ११ गेट उघडण्यात आले. चिचडोह बॅरेजचेही सर्व ३८ गेट उघडे असून पावसामुळे त्यातील विसर्गही वाढला आहे. त्यामुळे काही प्रमुख नद्या आणि उपनद्यांची पाणीपातळी वाढली.
पुरात अडकलेल्यांना हलविले
दरम्यान, आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने पुरात अडकलेल्या गोलाकर्जी येथील २० लोकांना गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत हलविण्यात आले आहे. तसेच लिंगमपल्ली येथील २५ लोकांना गावातील उंच स्थळी स्थलांतरित केले जात आहे. याशिवाय आलापल्लीवरून पेरमिलीकडे निघालेल्या २ महिला आणि एका पुरुषाला पेरमिलीच्या नाल्याला आलेल्या पुरामुळे पलीकडे जाता येत नव्हते. त्याचवेळी दुसऱ्या बाजुने नाल्याचा प्रवाह वाढल्यामुळे त्यांना सुरक्षित स्थळी जाणे कठीण झाले. पेरमिली उपपोलीस स्टेशनच्या पथकाने ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने किती लोक अडकलेले आहेत याची पाहणी केली असता ते व्यक्ती उंचवट्याच्या ठिकाणी थांबलेले आढळले. त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याची कार्यवाही बचाव पथकामार्फत सुरू आहे.
या मार्गावरील वाहतूक थांबली
पुरामुळे ताडगाव ते हेमलकसा या दरम्यान कुमरगुडा नाला आणि हेमलकसा नाल्यावरील रपटे वाहून गेल्यामुळे वाहतूक थांबली आहे. आष्टी ते आलापल्ली मार्गात चौडंगपल्ली नाल्याच्या पुराचे पाणी पुलावरून वाहात असल्याने वाहतूक ठप्प आहे. कमनचेरू ते आलापल्ली मार्गावर तानबोडी नाल्याच्या पुरामुळे वाहतूक बंद आहे. तसेच नागेपल्ली ते अहेरी मार्गावरील नाल्याच्या पुरामुळे वाहतूक बंद पडली आहे. सिरोंचाकडून छत्तीसगडकडे जाणाऱ्या मार्गावरही पुलावर पाणी असल्याने वाहतूक बंद आहे.
सतर्कता बाळगा, धर्मरावबाबांचे आवाहन
- दुर्गम भागातील गावांचा संपर्क मुख्यालयाशी तुटला आहे. ठिकठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क व सुरक्षित राहावे, पाण्याचा अंदाज नसल्यास पुलावरून वाहने किंवा स्वतः वाहत्या पाण्यातून मार्ग काढत जाऊ नये, सुरक्षित ठिकाणी विसावा घ्यावा, पाणी ओसरल्यानंतरच घरी किंवा शेतशिवारात जावे, लहान मुलांना पाण्याच्या ठिकाणी सोडू नये याची खबरदारी घ्यावी. तसेच ग्रामस्थांनी गुरे ढोरे पाण्यात सोडू नये. नदीपात्रात मासेमारी करण्यासाठी अथवा इतर कुठल्याही कारणास्तव जाऊ नये, असे आवाहन आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी केले आहे.