उन्हाळी धान पिकाची लागवड वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2017 02:05 AM2017-03-12T02:05:31+5:302017-03-12T02:05:31+5:30
शासकीय योजनेतून चामोर्शी तालुक्यासह जिल्हाभरात सिंचन सुविधा झाल्याने उन्हाळी धान पिकाची लागवड आता वाढली आहे.
शेतशिवार हिरवेगार : चामोर्शी तालुक्यासह जिल्हाभरात दुबार धान पीक
चामोर्शी : शासकीय योजनेतून चामोर्शी तालुक्यासह जिल्हाभरात सिंचन सुविधा झाल्याने उन्हाळी धान पिकाची लागवड आता वाढली आहे. चामोर्शी तालुक्यात उन्हाळी धानपीक चांगले बहरले असून ते हिरवेगार दिसत आहे.
गडचिरोली जिल्ह्यात बाराही तालुके मिळून उन्हाळी धान पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र जवळपास दोन हजार हेक्टर आहे. विशेष म्हणजे, सिरोंचा व चामोर्शी तालुक्यात तसेच वैरागड परिसरात उन्हाळी धान पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. चामोर्शी तालुक्यातील शेतकरी हलक्या व जड प्रतीच्या धानाचे उत्पादन घेत असतात. चामोर्शी तालुका मुख्यालयापासून आष्टीकडे जाणाऱ्या मार्गालगतच्या शेतशिवारात शेतकऱ्यांनी उन्हाळी धान पिकाची लागवड केली आहे. धान रोवणीची कामे आटोपली असून शेत शिवार आता हिरवेगार दिसत आहे. धान पिकाला सिंचनाची सुविधा उपलब्ध असल्याने शेतकरी दुबार पिकांकडे वळले आहेत. चामोर्शी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी हलक्या व संकरीत वाणाची धान लागवड शेतात केली आहे. सदर उन्हाळी धान पिकाचे उत्पादन मे महिन्याच्या अखेरीस शेतकऱ्यांच्या हातात पडणार आहे. चामोर्शी व सिरोंचा तालुक्यात सर्वाधिक उन्हाळी धान पिकाची लागवड करण्यात आली असून शेकडो हेक्टर क्षेत्रावर धान पीक बहरले आहे. पिकामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारत आहे. (शहर प्रतिनिधी)