आरमोरीत पाण्यासाठी मारामार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 12:58 AM2018-01-18T00:58:23+5:302018-01-18T00:58:44+5:30
शहरातील काळागोटा हनुमान नगर परिसरातील एकमेव हातपंप बंद असून या भागात नगर पंचायतीच्या नळ योजनेचे पाणी पोहोचत नाही. त्यामुळे या भागात ऐन हिवाळ्याच्या दिवसात पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : शहरातील काळागोटा हनुमान नगर परिसरातील एकमेव हातपंप बंद असून या भागात नगर पंचायतीच्या नळ योजनेचे पाणी पोहोचत नाही. त्यामुळे या भागात ऐन हिवाळ्याच्या दिवसात पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
शहरातील काळागोटा हनुमान नगरात मोठ्या संख्येने लोकवस्ती असताना नगर पंचायत प्रशासनाने येथे एकच हातपंप दिला आहे. या एकमेव हातपंपावर महिलांची प्रचंड गर्दी होत असते. वारंवार पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण होऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. नागरिकांना पुरेसे पाणी मिळावे, यासाठी नगर पंचायतीने सदर हातपंपावर सौरऊर्जेवरील नळपाणीपुरवठा योजना कार्यान्वित करावी, अशी मागणी उपसरपंच रघुनाथ मोंगरकर, मिलींद खोब्रागडे यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते व नागरिकांनी केली आहे.
आरमोरी शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून शहराला १९ लाख लीटर पाण्याची गरज असताना प्रत्यक्ष निम्म्यापेक्षा कमी म्हणजे सात लाख लीटर पाणी पुरवठा करण्यात येतो. हा पाणी पुरवठा पुरेसा नसल्याने अनेक भागातील नागरिक त्रस्त आहेत. नगर पंचायत प्रशासनाच्या वतीने गाढवी व वैनगंगा या नद्यांवर नळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. या दोन्ही योजनेअंतर्गत सात लाख लीटर पाणीपुरवठा दररोज होतो. शासन नियमानुसार शहरी भागात राहणाºया प्रत्येक व्यक्तीला दिवसातून ७० लीटर पाण्याची गरज असते. नळ योजनेअंतर्गत नदीपात्रातून इंटक वेलमध्ये पाणी ओढण्यासाठी कमी वीज दाबाची मशिन बसविण्यात आली आहे. त्यामुळे आरमोरी शहराला पाणीपुरवठा होण्यास बराच विलंब होतो. योग्य उपाययोजना करून शहरातील पाणी प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी होत आहे.