नवस बोलणे हे देवाला लाच देण्यासारखे आहे -अविनाश पाटील

By Admin | Published: March 28, 2017 12:37 AM2017-03-28T00:37:36+5:302017-03-28T00:37:36+5:30

अंधश्रद्धा निर्मूलन समिती देव व धर्माच्या विरोधात नाही. मात्र देवाच्या नावावर अंधश्रद्धा पसरविणाऱ्यांच्या निश्चितच विरोधात आहे. देव हा उदात्त मनाचा आहे.

Speaking vow is like giving bribe to God - Avinash Patil | नवस बोलणे हे देवाला लाच देण्यासारखे आहे -अविनाश पाटील

नवस बोलणे हे देवाला लाच देण्यासारखे आहे -अविनाश पाटील

googlenewsNext

गडचिरोली : अंधश्रद्धा निर्मूलन समिती देव व धर्माच्या विरोधात नाही. मात्र देवाच्या नावावर अंधश्रद्धा पसरविणाऱ्यांच्या निश्चितच विरोधात आहे. देव हा उदात्त मनाचा आहे. एखादे काम व्हावे यासाठी देवाला नवस बोलणे व ते काम झाल्यावर नवस फेडणे हे देवाला लाच देण्यासारखे आहे. त्यामुळे देवावर श्रद्धा ठेवताना नवस बोलण्याची व ते फेडण्याची अजिबात गरज नाही, असे परखड विचार महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी व्यक्त केले.
अविनाश पाटील हे गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान सोमवारी सायंकाळी ६ वाजता लोकमत जिल्हा कार्यालयाला भेट दिली. यावेळी अंधश्रद्धेवर त्यांनी आपले विचार मांडले. गडचिरोली जिल्ह्यात अशिक्षीतपणा अधिक आहे. तसेच आरोग्याच्या सुविधा कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिरोली जिल्ह्यात अंधश्रध्देची समस्या अधिक आहे. अंधश्रध्दा निर्मूलन करणे हे एकट्याचे काम नाही. तर यासाठी यंत्रणा विकसीत करणे आवश्यक आहे. यासाठी सर्वच क्षेत्रातील व्यक्तींचे प्रयत्न होणे गरजेचे आहेत. अंधश्रध्दा निर्मूलनात विशेष करून शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींचे सहकार्य गरजेचे आहे. व्यक्तीला होणारे रोग, त्याची लक्षणे व त्यावरील उपाय डॉक्टर चांगल्या पध्दतीने समजावून सांगतात. सर्दी हा रोग आठ दिवसात आपोआप बरा होतो. तरीही नागरिक पुजाऱ्याकडे जातात. आठ दिवसानंतर सर्दी नाहीशी होते व त्याचे श्रेय मात्र पुजाऱ्याला जाते. प्रबोधन, कार्यकर्त्यांना प्रशिक्षण आदींच्या माध्यमातून अंधश्रध्दा निर्मूलनाचे काम सुरू आहे. अंधश्रध्देमुळे व्यक्तीचा कामावरचा तसेच स्वत:वरचाही विश्वास उडतो. व्यक्ती दैववादी बनून प्रयत्न करणे सोडतो व तेथून त्याच्या अधोगतीला सुरूवात होते. गडचिरोली जिल्ह्यात अंधश्रद्धा निर्मूलन समिती सध्या एटापल्ली, आलापल्ली, अहेरी, घोट, चामोर्शी, आष्टी, लखमापूर बोरी येथे कार्यरत आहे. जिल्हाभर विस्तार करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती लोकमत प्रतिनिधीला दिली. यावेळी त्यांच्यासोबत समितीचे राज्य सरचिटणीस गजेंद्र सुरकार, जिल्हा कार्याध्यक्ष विलास निंबोरकर, प्रधान सचिव पुरूषोत्तम ठाकरे उपस्थित होते.

Web Title: Speaking vow is like giving bribe to God - Avinash Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.