विशेष कृती शिबीर राबवून राेजगाराची संधी देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:32 AM2021-02-08T04:32:04+5:302021-02-08T04:32:04+5:30
गडचिराेली : जिल्ह्यात राहून तंत्रशिक्षण पदविका घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना राेजगार व व्यवसाय उपलब्ध करून देण्यासाठी तंत्रशिक्षण संचालनालयाकडून ...
गडचिराेली : जिल्ह्यात राहून तंत्रशिक्षण पदविका घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना राेजगार व व्यवसाय उपलब्ध करून देण्यासाठी तंत्रशिक्षण संचालनालयाकडून विशेष उपक्रम आखण्यात आले आहेत. गडचिराेली जिल्ह्यात उद्याेगधंद्याचा अभाव असल्याने स्थानिक पातळीवर राेजगार उपलब्ध हाेत नाही. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांसाठी नाेकरीविषयक विशेष कृती शिबीर राबवून राेजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येतील, असे प्रतिपादन तंत्रशिक्षण संचालनालय मुंबईचे संचालक डाॅ. अभय वाघ यांनी केले. गडचिराेली येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये ४ फेब्रुवारीला घेण्यात आलेल्या मार्गदर्शन शिबिरात ते बाेलत हाेते.
कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे उपसचिव सतीश तिडके, राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे संचालक डाॅ. विनाेद माेहितकर, तंत्रशिक्षण विभागीय सहसंचालक डाॅ. मनाेजकुमार डायगव्हाणे उपस्थित हाेते. तंत्रशिक्षणातून समाज बदलण्याचे बळ आहे. तंत्रशिक्षण पदविका अभ्यासक्रम केवळ उच्च शिक्षणाचे माध्यम न बनता पदविका अभियंते हे समाजासाठी राेजगारक्षम घटक बनले पाहिजे, असे प्रतिपादन सतीश तिडके यांनी केले.
संस्था परिसरात उपलब्ध असलेल्या भाैतिक सुविधांची पाहणी डाॅ. वाघ यांनी केली. तसेच विद्युत अभियांत्रिकी विभागाने तयार केलेल्या ‘सेव्ह’ या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. दरम्यान, तंत्रनिकेतनचे प्राचार्य डाॅ. अतुल बाेराडे यांनी संस्थेमार्फत राबविलेल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. सूत्रसंचालन प्रा. इंद्रजित सांगाेळे यांनी केले. यशस्वीतेसाठी समन्वयक प्रा. सुरेंद्र बांबाेळे व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.