पर्यटनासाठी गडचिराेलीवरून विशेष बसगाड्यांची हाेणार साेय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 05:00 AM2021-01-04T05:00:00+5:302021-01-04T05:00:32+5:30
पूर्व विदर्भात अनेक प्रेक्षणीयस्थळे आहेत. मात्र, ही स्थळे एकाचवेळी व एकाच दिवशी पाहणे शक्य हाेत नाही. परिणामी नागरिक या स्थळांना भेटी देऊ शकत नव्हते. त्यामुळे जवळचे ठिकाणी असूनही ही स्थळे अनेकांनी बघितली नाहीत. एस.टी.ने आता या स्थळांना भेट देण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. दर शनिवारी व रविवारी कर्मचारी व इतर वर्गाला सुटी असल्याने या दाेन दिवशी तसेच इतर सार्वजनिक सुटीच्या दिवशी पर्यटनस्थळांसाठी स्वतंत्र बसेस साेडण्याचे नियाेजन एस.टी.ने केले आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : चंद्रपूर, गडचिराेली, भंडारा व गाेंदिया जिल्ह्यांमधील पर्यटनस्थळे व तीर्थस्थळांसाठी गडचिराेली येथून दर शनिवारी व रविवारी तसेच सार्वजनिक सुटीच्या दिवशी स्वतंत्र बसेस साेडल्या जाणार आहेत. कमी खर्चात एकाच दिवशी अनेक पर्यटनस्थळे पाहण्याची संधी जिल्हावासीयांना उपलब्ध हाेणार आहे.
पूर्व विदर्भात अनेक प्रेक्षणीयस्थळे आहेत. मात्र, ही स्थळे एकाचवेळी व एकाच दिवशी पाहणे शक्य हाेत नाही. परिणामी नागरिक या स्थळांना भेटी देऊ शकत नव्हते. त्यामुळे जवळचे ठिकाणी असूनही ही स्थळे अनेकांनी बघितली नाहीत. एस.टी.ने आता या स्थळांना भेट देण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. दर शनिवारी व रविवारी कर्मचारी व इतर वर्गाला सुटी असल्याने या दाेन दिवशी तसेच इतर सार्वजनिक सुटीच्या दिवशी पर्यटनस्थळांसाठी स्वतंत्र बसेस साेडण्याचे नियाेजन एस.टी.ने केले आहे. एकाच मार्गावर असलेल्या विविध स्थळांना भेटी देता येईल, या उद्देशाने मार्ग निश्चित करण्यात आला आहे. सकाळी गडचिराेली आगारातून बस निघेल व सायंकाळी किंवा रात्रीपर्यंत बस आगारात पाेहाेचेल. अंतरानुसार तिकीट ठरविण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात चार मार्ग निवडण्यात आले आहेत. या मार्गांवर चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर बसेसची संख्या वाढविली जाणार आहे.
पर्यटक व भाविकांच्या साेयीसाठी स्वतंत्र बसेस सुरू करण्याचे नियाेजन करण्यात आले आहे. यासाठी प्रवाशांना ऑनलाईन नाेंदणी करता येणार आहे. तसेच अधिकची माहिती बसस्थानकावर उपलब्ध हाेईल. पुरेसे प्रवासी मिळाल्यानंतर बस साेडली जाणार आहे. कमी खर्चात अनेक पर्यटनस्थळे पाहण्याची संधी या बसमुळे उपलब्ध हाेणार आहे. प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा.
- अशाेक वाडीभस्मे, विभाग नियंत्रक गडचिराेली
या ठिकाणांना भेट देण्याची संधी
गाेसेखुर्द-घाेडाझरी-गायमुख-अड्याळटेकडीसाठी सकाळी ८ वाजता गडचिराेली येथून बस निघेल. ही बस त्याच दिवशी सायंकाळी ६ वाजता गडचिराेलीत परत येईल. यासाठी २१५ रुपये तिकीट आकारले जाणार आहे.
ब्रह्मपुरी-चपराळ-नवेगाव बांध-इटियाडाेह या स्थळांसाठी सकाळी ८ वाजता बस निघेल. त्यासाठी २१५ रुपये तिकीट आकारली जाईल.
अहेरी-कमलापूर (हत्तीकॅम्प)- वडधम- मेडीगड्डा-साेमनूर (त्रिवेणी संगम) यासाठी गडचिराेली येथून सकाळी ७ वाजता बस निघेल. सायंकाळी ६ वाजता बस गडचिराेलीला परत येईल. यासाठी ४१० रुपये तिकीट आकारले जाईल.
सेमाना-मार्कंडादेव-चिचपल्ली (हनुमान मंदिर)-अजयपूर (झाेपला माराेती) यासाठी गडचिराेली येथून सकाळी ७ वाजता बस निघेल. सायंकाळी ६ वाजता बस परत येईल. यासाठी २६० रुपये तिकीट आकारले जाणार आहे.