संपूर्ण लसीकरणासाठी सात तालुक्यात विशेष मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2021 05:00 AM2021-12-17T05:00:00+5:302021-12-17T05:00:30+5:30
विशेष मोहिमेसाठी आरोग्य विभागाच्या जिल्ह्यात २५४ चमू तयार केल्या आहेत. एका चमूत दोन आरोग्य कर्मचारी राहतील. प्रत्येक चमूला दरदिवशी गावाचे वाटप करून त्या ठिकाणी लसीकरणाबाबत जनजागृती तसेच प्रत्यक्ष पात्र नागरिकांना लस द्यायची आहे. २० ते २७ डिसेंबरपर्यंतच्या कालावधीत ही मोहीम राबविण्यात येणार आहे. यासाठी ८३० गावात पहिला डोस घेणे शिल्लक असलेल्या १ लाख २५ हजार नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून वारंवार आवाहन, जनजागृती केल्यानंतरही कोरोनाच्या लसीकरणाला प्रतिसाद न देणाऱ्या नागरिकांना आता घरोघरी जाऊन लस देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. ‘हर घर दस्तक’ नावाच्या या मोहिमेत लसीकरणात मागे असलेल्या सात तालुक्यांचा समावेश राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी संजय मीना यांनी येथे पत्रपरिषदेत दिली.
पहिल्या टप्प्यात ही मोहीम २० डिसेंबरपासून धानोरा, मुलचेरा, अहेरी, भामरागड, सिरोंचा, एटापल्ली आणि चामोर्शी या सात तालुक्यांमध्ये राबविली जाणार आहे. सर्वसामान्य नागरिकांना लसीकरण केंद्रावर पोहोचणे शक्य होत नसल्यामुळे आरोग्य विभागाचेच कर्मचारी गावोगावी वाड्या-वस्तीवर जाऊन लसीकरण करणार आहे. जिल्ह्यातील पात्र नागरिकांचा प्राधान्याने पहिला डोस पूर्ण करणे, हा या लसीकरणाचा प्रमुख उद्देश आहे.
गेल्या काही काळात घरोघरी तसेच शेताच्या बांधावर जाऊन लसीकरण प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी संजय मीना व मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आरोग्य विभागाला सदर अभियान राबवून लसीकरणाला वेग देण्याच्या सूचना केल्या होत्या.
त्यानुसार ही मोहीम आखण्यात आली. मोहिमेच्या कालावधीत वेगवेगळ्या गावांमध्ये लसीकरण सत्राचे आयोजन केले जाणार आहे. एक लाखाच्या लसीकरणाचा टप्पा या मोहिमेत पूर्ण करण्यासाठी १४२४ लसीकरण सत्रांचे आयोजन केले जाणार आहे. यामध्ये धानोरा येथे १२३, मुलचेरा ८१, अहेरी ४४९, भामरागड १०५, सिरोंचा १६५, एटापल्ली ३०८ तथा चामोर्शी तालुक्यात १९३ लसीकरण सत्रांचा समावेश आहे.
२५४ चमू जाणार ८३० गावात
या विशेष मोहिमेसाठी आरोग्य विभागाच्या जिल्ह्यात २५४ चमू तयार केल्या आहेत. एका चमूत दोन आरोग्य कर्मचारी राहतील. प्रत्येक चमूला दरदिवशी गावाचे वाटप करून त्या ठिकाणी लसीकरणाबाबत जनजागृती तसेच प्रत्यक्ष पात्र नागरिकांना लस द्यायची आहे. २० ते २७ डिसेंबरपर्यंतच्या कालावधीत ही मोहीम राबविण्यात येणार आहे. यासाठी ८३० गावात पहिला डोस घेणे शिल्लक असलेल्या १ लाख २५ हजार नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र यांच्या चमूसह गावातील कोतवाल, तलाठी, ग्रामसेवक, आशा व अंगणवाडी ताई यांची मदत घेतली जाणार आहे.
अजून १ लाख ७६ हजार लोक लसीकरणापासून दूर
गडचिरोली : जिल्ह्यात लसीकरणासाठी पात्र असलेल्या नागरिकांपैकी ७८.९१ टक्के नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. अजूनही १ लाख ७६ हजार ९० नागरिकांनी पहिलाही डोस घेतलेला नाही. त्यामुळे या मोहिमेत आठ दिवसांमध्ये किमान १.२५ लाख नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यामुळे गडचिरोली जिल्हा १०० टक्के लसीकरणाजवळ पोहोचेल अशी शक्यता आहे. या पत्रकार परिषदेला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय जठार, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विनोद मशाखेत्री यांचीही उपस्थिती होती.
शेतीमधील कामात तसेच इतर मजुरीच्या कामात व्यस्त असलेल्या नागरिकांसाठी ही मोहीम उपयोगी आहे. आरोग्य विभागाची टीम दिवसा तसेच आवश्यकतेनुसार रात्रीही लसीकरण करणार आहे. प्रशासनाच्या या मोहिमेला लसीकरण बाकी असलेल्या नागरिकांनी प्रतिसाद द्यावा.
- संजय मीना, जिल्हाधिकारी