अयोध्या राममंदिराला गडचिरोलीचे सागवान, काष्टपूजेवरून राजकारण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 03:17 PM2023-03-27T15:17:34+5:302023-03-27T15:18:38+5:30
वनमंत्र्यांचा विरोध डावलून आलापल्लीत पहिली शोभायात्रा
आलापल्ली (गडचिरोली) : अयोध्येतील राममंदिरासाठी खास गडचिरोली जिल्ह्यातील दुर्मीळ व मौल्यवान सागवान जाणार आहे. हे सागवान रवाना करताना काष्टपूजा व पहिली शोभायात्रा चंद्रपूर येथे काढण्याच्या वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांच्या निर्णयाला स्थानिकांनी विरोध केला. २६ मार्चला आलापल्ली येथेच काष्टपूजा करून शोभायात्रा काढण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५ऑगस्ट २०२० रोजी अयोध्या येथील राममंदिराच्या बांधकामाचे भूमिपूजन झाले तेव्हापासून मंदिर निर्माणाचे कार्य वेगाने सुरू आहे. आगामी सुमारे एक हजार वर्षे श्रीराम मंदिराची वास्तू उभी राहावी यासाठी वास्तू तज्ज्ञांच्या देखरेखीखाली काम सुरू आहे.त्यासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला मंदिराच्या महाद्वार,गर्भगृहाचा दरवाजा, मुख्य मंदिर वास्तूतील इतर दरवाजे यासाठी देशातील सर्वोत्तम सागवान हवे आहे. हे दुर्मीळ सागवान आलापल्ली येथे उपलब्ध आहे.
सागवान आमचे म्हणत काढली मिरवणूक...
आलापल्ली येथील सागवान बल्लारपूर येथील मुख्य सागवान डेपो येथे जमा करून २९ मार्चला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याहस्ते काष्ठ पूजन आणि आरती करून पहिली शोभायात्रा चंद्रपूर येथे काढण्यात येणार आहे. मात्र, सागवान गडचिरोलीचे तर पूजा व शोभायात्रेचा मानही गडचिरोलीलाच असे म्हणून स्थानिकांनी विरोध केला. काहींनी थेट वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क केला. मात्र, त्यांनीसुद्धा मुख्य डेपो बल्लारपूर येथे असल्याने काष्ट पूजा,आरती व पहिली शोभायात्रा चंद्रपूर येथूनच निघणार असे म्हटले. त्यानंतर आलापल्ली येथे २६ मार्च रोजी जय श्रीराम,जय श्रीराम जयघोषात मोठ्या जल्लोषात शोभायात्रा निघाली. यावेळी सागवानाची काष्टपूजा करून ते पुन्हा वन विकास महामंडळाला परत केले.
४२ दरवाजांसाठी १८५४ घनफुटांचे लाकूड
अयोध्येतील राममंदिरात गर्भगृह तळमजला व महिला माळा, लाकडी दरवाजांसाठी दोन, तळमजला जिन्याच्या लाकडी दरवाजांसाठी दोन, मध्यभागी मंडपात लाकडी दरवाजांसाठी १६, बाहेरील मंडप लाकडी दरवाजांसाठी १८ तसेच पहिला व दुसरा माळा जिन्याच्या लाकडी दरवाजासाठी चार असे एकूण १८५४.९९ घन फूट सागवान लाकडाची मागणी आहे. एवढे सागवान अयोध्येला जाणार आहे.