ग्रामीण भागात सट्टापट्टी सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:46 AM2021-04-30T04:46:12+5:302021-04-30T04:46:12+5:30
कुरखेडा : तालुक्यासह शहरी भागात सट्टापट्टीचे नंबर पाहण्यासाठी मोबाईलद्वारे इंटरनेटचा वापर वाढला आहे. अनेक लोक भ्रमणध्वनीवर इंटरनेटद्वारे सट्टापट्टीचे नंबर ...
कुरखेडा : तालुक्यासह शहरी भागात सट्टापट्टीचे नंबर पाहण्यासाठी मोबाईलद्वारे इंटरनेटचा वापर वाढला आहे. अनेक लोक भ्रमणध्वनीवर इंटरनेटद्वारे सट्टापट्टीचे नंबर शोधताना दिसून येतात. मात्र, याकडे दुर्लक्ष आहे.
शाैचालयाचा वापर नाही
आलापल्ली : बहुतांश नागरिकांकडे शौचालय आहे. मात्र, ग्रामीण भागातील नागरिक शौचालयाचा वापरच करीत नाही. परिणामी शौचालय बेकामी झाले आहेत. शौचालयाचा वापर न झाल्याने हागणदारीमुक्त गाव निर्माण करणे अडचणीचे झाले आहे. याबाबत जनजागृती करण्याची गरज आहे.
धोडराज मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य
भामरागड : भामरागडवरून धोडराज पाच कि.मी. अंतरावर आहे. दरम्यानच्या मार्गावर खड्डे पडले आहेत. मागील सात वर्षांपासून या मार्गाची दुरुस्तीच करण्यात आलेली नाही.
दत्त मंदिराचा विकास करा
आरमोरी : तालुक्यातील रामपूर चक येथे दत्ताचे मंदिर आहे. भाविकांची गर्दी वाढत आहे. परंतु, मंदिराच्या विकासाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या मंदिराचे सौंदर्यीकरण करावे, अशी मागणी होत आहे. स्थानिक लाेकांच्या मागणीची दखल घेऊन प्रशासनाने सहकार्य करावे.
गावांचे पुनर्वसन रखडले
आष्टी : आष्टी परिसरातील चपराळा अभयारण्यांतर्गत चपराळा व इतर लहान मोठी चार ते पाच गावे येतात. या अभयारण्यातील पशूंमुळे धोका आहे. आजपर्यंत वन्यपशूंचे अनेक हल्ले नागरिकांवर झाले आहेत.
मोबाईल सेवा कूचकामी
आलापल्ली : आलापल्ली येथे बीएसएनएलच्या वतीने थ्री-जी सेवा बसविण्यात आली आहे. मात्र ही थ्री-जी सेवा केवळ नावापुरतीच असल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणी बीएसएनएलचा इंटरनेट स्पीड टू-जी सेवेप्रमाणे दिले जात आहे.
अंतर्गत रस्ते उखडलेले
कुरखेडा : कुरखेडा शहराच्या अनेक वॉर्डातील अंतर्गत रस्त्यांवर मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. त्यामुळे वाहनधारक कमालीचे त्रस्त झाले आहेत. वारंवार मागणी करूनही नगर पंचायत प्रशासन रस्ता दुरुस्तीच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे. प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे.
रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची मागणी
गडचिरोली : जिल्ह्यातील बहुतांश मार्गांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. हे खड्डे बुजविण्याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. खड्ड्यांमुळे अपघातांच्या संख्येतही वाढ झाली आहे. बांधकाम विभागाने याकडे वेळीच लक्ष घालून खड्डे बुजवावेत, अशी मागणी आहे.
पथदिवे नियमित सुरू ठेवण्याची मागणी
गडचिरोली : शहराच्या मुख्य तसेच अंतर्गत मार्गावरील पथदिवे अनेकदा रात्रीच्या सुमारास बंद स्थितीत असतात. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे पथदिवे नियमित सुरू ठेवावे, अशी मागणी होत आहे.
बँकांअभावी विकासावर परिणाम
गडचिरोली : ग्रामीण भागामध्ये राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखा नाहीत. त्यामुळे नागरिकांना आर्थिक व्यवहार करताना अडचण निर्माण होत आहे. राष्ट्रीयीकृत बँकांना ग्रामीण भागात शाखा स्थापन करण्याचे आदेश द्यावे.
दूध शीतकरण केंद्राची इमारत बेवारस
अहेरी : तालुक्यातील आलापल्लीनजीक असलेल्या नागेपल्ली येथील शासकीय दूध शीतकरण केंद्राची इमारत बेवारस स्थितीत आहे. लाखो रुपये खर्चून ही इमारत बांधण्यात आली. मात्र, या ठिकाणी यंत्र सामग्री आणण्यात आली नाही.
जि. प. कॉलनीतील घरांची दुरवस्था
गडचिरोली : कॉम्प्लेक्स परिसरात जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी व जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांसाठी ५०० घरांची स्वतंत्र कॉलनी वसविण्यात आली आहे. या कॉलनीतील घरांची दुरवस्था झाली आहे. अनेक घरांची पडझड झाली असल्याने या घरांमध्ये राहणेही कठीण झाले आहे. ही घरे दुरुस्त करावी, अशी मागणी होत आहे.
कर्मचारी करतात ५० किमीवरून अपडाऊन
धानोरा : तालुक्यातील अनेक कर्मचारी गडचिरोली येथे राहून सेवा देतात. ५० किमी अंतरावरून आल्यावर त्यांची काम करण्याची इच्छा राहत नाही. शारीरिक व मानसिकदृष्ट्या थकलेले राहतात. त्यामुळे त्यांना मुख्यालयी राहणे सक्तीचे करावे, अशी मागणी आहे.
कमलापुरातील समस्यांकडे दुर्लक्ष
कमलापूर : अहेरी तालुक्यातील महत्त्वपूर्ण गाव म्हणून ओळख असलेल्या कमलापूर येथे सोयीसुविधांची भरमार असणे जनतेला अपेक्षित होते. परंतु, कित्येक वर्षांपासून गावातील नागरिकांना मूलभूत समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
तपासणी नाक्यावर पुरेसे कर्मचारी द्या
आरमोरी : तालुक्यातील नाक्यावर केवळ अपुरे कर्मचारी तैनात आहेत. या कर्मचाऱ्यांना सतत तीन पाळीत आपली जबाबदारी निभवावी लागत आहे. एका कर्मचाऱ्याला किमान १६ तास काम करावे लागत आहे. त्यामुळे नाक्यावरील कर्मचारी त्रस्त आहेत. कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीची मागणी होत आहे.
दिभना मार्गाचे रुंदीकरण करा
गडचिरोली : वन विभागाचा नाका ते दिभना मार्गावर दिवसभर वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे या मार्गाचे रुंदीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या मार्गाची सध्या दुरवस्था झाली असल्याने दुरुस्तीसह रुंदीकरण करावे, अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे.
पट्टे वाटपासाठी अट शिथिल करा
गडचिरोली : गैरआदिवासी नागरिकांना वनपट्टा देण्यासाठी शासनाने ७५ वर्षांपासून जमिनीवर अतिक्रमण करून असल्याचा दाखला जोडावा लागतो. ही अट शिथिल करण्याची मागणी आहे. शेकडो दावे तहसीलदारांमार्फत उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आले आहेत. मात्र, ७५ वर्षांची अट असल्याने अनेक दावे प्रलंबित आहेत.
मोकाट जनावरांमुळे रहदारी बाधित
एटापल्ली : शहरातील मुख्य मार्गांवर मोकाट जनावरे मधोमध उभे राहतात. त्यामुळे रहदारी बाधित होत असून, वाहनधारकांना नेहमी अपघाताची भीती असते. अनेक मार्गांवर मोकाट जनावरांमुळे वाहतूक बाधित होते.
आकाशवाणी केंद्र निर्मितीचे काम थंडावले
गडचिरोली : गडचिरोली येथे आकाशवाणी केंद्र उभारण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सूचनेनंतर केंद्र सरकारने घेतला होता. मात्र, आकाशवाणी केंद्र निर्मितीचे काम अद्यापही थंडबस्त्यात आहे. शासनाचेही याकडे दुर्लक्ष आहे.
योजनांच्या माहितीसाठी केंद्र निर्माण करा
कुरखेडा : केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजनांच्या माहितीअभावी नागरिक योजनेच्या लाभापासून वंचित राहतात. त्यामुळे तालुकास्तरावर कायमस्वरूपी जनसंपर्क कार्यालयाची निर्मिती करावी, अशी मागणी आहे.
कन्नमवार नगरात डासांचा प्रादुर्भाव वाढला
गडचिरोली : कन्नमवार नगरातील अनेक नाल्या तुंबल्या असल्याने परिसरात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कॅम्प एरियात नियमित डास प्रतिबंधक फवारणी करावी.
गरोदर मातांना बुडीत मजुरी देण्याची मागणी
सिरोंचा : गरोदर मातांना शासनाकडून बुडीत मजुरी दिली जाते. मात्र, जिल्ह्यातील मातांना ही मजुरी देण्यात आली नसल्याचे दिसून येत आहे. महिला दवाखान्यामध्ये चकरा मारत आहेत. ही मजुरी तत्काळ देण्याची मागणी होत आहे. काही महिलांना एक ते दीड वर्षापासून बुडीत मजुरी देण्यात आली नाही. त्यामुळे महिला अद्यापही वंचित आहेत.
घर बांधकामाचा खर्च दुपटीने वाढला
गडचिरोली : गेल्या दोन वर्षांपासून लोहा, सिमेंट, रेती, विटा, गिट्टी व इतर बांधकाम साहित्याचे भाव प्रचंड वधारले आहे. याशिवाय मिस्त्री व मजुरीच्या दरातही वाढ झाली आहे. त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत आता घर व इमारत बांधकामाचा खर्च दुपटीवर वाढला आहे.
पशू योजनांबाबत जनजागृती करा
भामरागड : पशुसंवर्धन विभागाच्या वतीने पशुपालकांसाठी विविध योजना राबविल्या जातात. मात्र, बहुतांश पशुपालकांना या योजनांची माहिती नसल्याने ते या योजनांचा लाभ घेऊ शकत नाही. पशुसंवर्धन विभागाने या योजनांची व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याची गरज आहे. पशुपालन हा शेतीला चांगला जोडधंदा आहे. त्यामुळे या योजनांची जनजागृती करावी.
अर्धवट पुलावरून खडतर प्रवास
धानोरा : तालुक्यातील राजोली गावाजवळच्या कठाणी नदीवर पाच वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला पूल दोन वर्षांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे रपट्यासह वाहून गेला. दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसांत या गावातील विद्यार्थी व नागरिकांना पुलाअभावी नवरगाव मार्गे अधिकचे १५ किमी अंतर कापून धानोरा तालुका मुख्यालय व गडचिरोली मुख्यालय गाठावे लागते.