लहान पऱ्ह्यांमुळे रोवणीची गती मंदच
By admin | Published: July 8, 2016 01:36 AM2016-07-08T01:36:13+5:302016-07-08T01:36:13+5:30
जिल्ह्यात पंधरवड्यापासून काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी तुरळक पाऊस येत आहे. उन्हाळ्यात ज्या शेतकऱ्यांनी धूळ पेरणी केली
कोरडवाहू शेतकऱ्यांना प्रतीक्षाच : सिंचनाची सोय असलेले शेतकरी कामाला लागले
गडचिरोली : जिल्ह्यात पंधरवड्यापासून काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी तुरळक पाऊस येत आहे. उन्हाळ्यात ज्या शेतकऱ्यांनी धूळ पेरणी केली तसेच ज्या शेतकऱ्यांजवळ सिंचनाची सोय उपलब्ध होती, असे शेतकरी पंधरवड्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे रोवणीच्या कामाला लागले आहेत. परंतु पावसाच्या प्रतीक्षेनंतर पेरणी केलेले शेतकरी अद्यापही रोवणीच्या कामात लागलेले नाही. त्यामुळे पाऊस पडूनसुद्धा धान रोवणीची गती मंदच असल्याचे चित्र आहे.
खरीप हंगामाला जिल्ह्यात सुरूवात झालेली आहे. परंतु मोजकेच शेतकरी या हंगामात व्यस्त आहेत. अनेक शेतकरी अद्यापही शेती कामाला लागलेले नाहीत. केवळ पऱ्हे व आवत्या पद्धतीने पेरणी शेतकऱ्यांनी केलेली आहे. जवळपास आठ दिवस शेतकऱ्यांना रोवणीसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या पावसाचा जोर आठ दिवसांनंतरही कायम राहिल्यास रोवणी हंगामास जोर येऊ शकतो. आठ दिवसांनंतर पावसाने हुलकावणी दिल्यास रोवणी योग्य होणारे पऱ्हे रोवणीच्या कामात येणार नाहीत. याकरिता आठ दिवसांनंतरही पावसाचे सातत्य असणे गरजेचे आहे. सध्या धान रोवणीला सुरूवात झाल्यामुळे अनेक गावांत मजुरांना काम मिळाले आहे. (शहर प्रतिनिधी)
नांगर व फणीचे दर वाढले
धान रोवणीला काही भागात सुरूवात झाली आहे. त्यामुळे अनेकांना यातून मजुरी मिळत आहे. परंतु यंदा गडचिरोली उपविभागात नांगर प्रतिदिन ४०० व फण प्रतिदिन ५०० रूपये भाडे आकारले जात आहे. त्यामुळे सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनाही भाड्याने नांगर अथवा फण करताना विचारच करावा लागत आहे. सध्या रोवणीची भर नसल्याने मजूरही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे.