विकास कामे करण्यास गती द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 10:51 PM2017-11-06T22:51:14+5:302017-11-06T22:51:33+5:30
पावसाळा संपला असल्याने आता विकासकामे करण्यास गती द्या. प्रत्येक विभागाला ठरवून दिलेले उद्दिष्ट मार्च अखेर पूर्ण करण्यासाठी प्रत्येक कर्मचारी, अधिकारी व विभाग प्रमुखांनी प्रयत्न करावे, ....
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : पावसाळा संपला असल्याने आता विकासकामे करण्यास गती द्या. प्रत्येक विभागाला ठरवून दिलेले उद्दिष्ट मार्च अखेर पूर्ण करण्यासाठी प्रत्येक कर्मचारी, अधिकारी व विभाग प्रमुखांनी प्रयत्न करावे, असे निर्देश आमदार डॉ. देवराव होळी यांनी केले.
गडचिरोली येथील जिल्हा परिषद हायस्कूल येथे सोमवारी गडचिरोली पंचायत समितीच्या वार्षिक आमसभेची आढावा बैठक सोमवारी आयोजित करण्यात आली. या बैठकीदरम्यान आमदार डॉ. देवराव होळी यांनी निर्देश दिले. सदर बैठकीला पंचायत समिती सभापती दुर्लभा बांबोळे, उपसभापती विलास दशमुखे, जिल्हा परिषद सदस्य निता साखरे, संवर्ग विकास अधिकारी पचारे, पं.स. सदस्य गोहणे, चिंचोळकर, गडचिरोलीचे नायब तहसीलदार आदी उपस्थित होते. आढावा बैठकीत आमदारांनी सर्व विभागांचा आढावा घेतला.
रोलेक्स कंपनीचे मीटरमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे सदर मीटर कंपनीकडे परत करावे. गडचिरोली तालुक्याला ३ हजार ६२ शौचालये बांधण्याचे उद्दिष्ट दिले आहे. मार्च महिन्यापूर्वी सर्व शौचालयांचे बांधकाम करण्याचे निर्देश दिले. काही पाणी पुरवठा योजना बंद असून या योजना सुरू करण्याचे निर्देशही दिले आहे.
ग्रामसेवकाला इतरांचे सहकार्य गरजेचे
शौचालयाचे बांधकाम करवून घेऊन त्यांचा वापर नागरिकांनी करावा, यासाठी जनजागृती करण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणा व इतरही विभागांची आहे. मात्र हे काम केवळ ग्रामसेवकावर लादून इतर यंत्रणा मोकळ्या झाल्या आहेत. हागणदारीमुक्तीमध्ये संबंधित नागरिकाला शौचालय बांधण्याच्या कामासाठी प्रवृत्त करणे एवढेच काम ग्रामसेवकाचे आहे. मात्र शौचालयाचे बांधकाम झाले नाही, निधी रखडला किंवा शौचालय बांधूनही हागणदारीमुक्त गाव झाले नाही तर संबंधित ग्रामसेवकालाच जबाबदार धरले जाते. ही चुकीचे असून इतरही यंत्रणांना त्यांच्या कामाची जाणीव करून द्यावी, अशी मागणी आ. डॉ. देवराव होळी यांच्याकडे ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष कविश्वर बनपुरकर यांनी आढावा बैठकीदरम्यान केली.
जलयुक्त शिवार अभियान कामाचा लागणार फलक
सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी राज्य शासनाने कोट्यवधी जलयुक्त शिवार अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत ग्रामीण भागात कोट्यवधी रूपयांची कामे केली जात आहेत. प्रत्येक गावात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत किती कामे झाली. त्यासाठी किती निधी खर्च झाला. याबाबतचे फलक गावाच्या दर्शनी भागावर लावून सदर फलकाचे पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच किंवा गावातील प्रतिष्ठीत नागरिक यांच्या मार्फत लोकार्पण करण्याचे निर्देश दिले.