आदिवासी देवतांच्या महापूजेला उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 01:42 AM2017-10-15T01:42:45+5:302017-10-15T01:42:55+5:30
चांदाळा मार्गावरील गोटूल भूमीवर आदिवासी देवातांच्या महापूजेचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : चांदाळा मार्गावरील गोटूल भूमीवर आदिवासी देवातांच्या महापूजेचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. या महापूजेला शेकडो आदिवासी इलाका पुजारी, भूमकाल, इलाका प्रमुख, तालुका प्रमुख उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजक असलेले आ. डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. यावेळी समाजसेवक देवाजी तोफा, माधव गोटा, सुरेश बारसागडे, डॉ. चौधरी, आदिवासी व गैरआदिवासी समाजातील विविध संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शनिवारी सायंकाळी ४ वाजता केवळ महापूजेचा कार्यक्रम पार पडला. रविवारी सकाळी १० वाजेपासून ग्रामसभांचा महामेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात जिल्हाभरातील ग्रासमभांचे प्रतिनिधी गावाच्या विकासात भेडसावणाºया समस्या मांडणार आहेत. या समस्या सोडविण्यासाठी विचारमंथन केले जाणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक गावांमध्ये पेसा कायदा लागू झाला आहे. मात्र अजूनपर्यंत नागरिक अनभिज्ञ आहेत. पेसाविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी काय उपाययोजना करता येईल, याबाबतही मेळाव्यात विचारमंथन केले जाणार असल्याची माहिती आ. डॉ. होळी यांनी दिली.