निधीअभावी रखडले क्रीडा संकुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 10:22 PM2018-04-12T22:22:58+5:302018-04-12T22:23:05+5:30

चामोर्शी येथील तालुका क्रीडा संकुलाचे काम मार्गी लागले असे दिसत असतानाच शासनाच्या नाकर्तेपणामुळे पुन्हा एकदा क्रीडा संकुलाचे काम निधी व अतिक्रमणाअभावी रखडले असल्याचे दिसून येत आहे.

The Sports Complex | निधीअभावी रखडले क्रीडा संकुल

निधीअभावी रखडले क्रीडा संकुल

googlenewsNext
ठळक मुद्देचामोर्शी येथील स्थिती : मंत्रालयात क्रीडा संकुलाचा प्रस्ताव सादर

लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : चामोर्शी येथील तालुका क्रीडा संकुलाचे काम मार्गी लागले असे दिसत असतानाच शासनाच्या नाकर्तेपणामुळे पुन्हा एकदा क्रीडा संकुलाचे काम निधी व अतिक्रमणाअभावी रखडले असल्याचे दिसून येत आहे.
चामोर्शी तालुक्याच्या निर्मितीपासून (१९८१) मंजूर असलेले तालुका क्रीडा संकूल जागेअभावी व लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याअभावी ३७ वर्ष थंडबस्त्यात होते. या प्रस्तावाला क्रीडा विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुन्हा फाईलमधून बाहेर काढले. चामोर्शी येथील सर्वे क्रमांक १४४२/१ मधील ८.२८ हेक्टर जमिनीवरील अतिक्रमण प्रशासनाने काढून टाकल्यानंतर २८ मार्च २०१७ ला क्रीडा अधिकाºयांनी तीन हेक्टर जागेची मोजणी केली. त्यानंतर क्रीडा संकुलासाठी तालुका प्रशासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यामुळे तालुका क्रीडा संकुलास गती मिळाली. आमदार व सत्तारूढ पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा इशारा देऊन अतिक्रमण काढण्याचे निर्देश दिले. वर्षाअखेर आमदारांच्या अध्यक्षतेखाली तालुका क्रीडा संकूल समिती गठीत झाली. मधल्या काळात अतिक्रमण काढलेल्या जागेवर पुन्हा अतिक्रमण करण्यात येऊन इमारत उभी करण्याचा प्रयत्न झाला. आमदारांच्या कार्यकत्यांनी पुन्हा अतिक्रमणाविरोधात आंदोलनाचा इशारा दिला. त्यामुळे प्रशासनाला झटके बसू लागले. तालुका क्रीडा समितीने खंबीरपणे निर्णय घेऊन संकुलाच्या निर्माण कार्यास गती दिली. २० मार्च २०१८ ला कार्यालय अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांनी तालुका क्रीडा संकुलाची बैठक घेतली. संकुलाचे अध्यक्ष असलेल्या आमदारांच्या अनुपस्थितीत अनेक निर्णय झाले. त्यानुसार १० एप्रिलपर्यंत अतिक्रमण पुन्हा काढण्याचे निर्देश दिले.
दरम्यान क्रीडा अधिकाºयांनी तीन कोटी रूपयांचा निधी मंजूर असल्याने त्या अधिनस्त ३.०६ कोटी रूपयांच्या कामाचा व सुधारीत ९.५४ कोटीच्या कामाचा प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावास नियमानुसार नगर पंचायतची नाहरकत प्रमाणपत्र, साबांविचे उपअभियंता, कार्यकारी अभियंता, मुख्य अभियंता यांची तांत्रिक मंजुरी घेतली. जिल्हा प्रशासनानेही २९ मार्च रोजी मंजुरी दिली. सदर प्रस्ताव तातडीने ३० मार्च रोजी मंत्रालयात नगर विकास विभागाकडे सादर केला. ३.०६ कोटीच्या प्रस्तावित कामात पूर्ण जागेवर संरक्षक भिंत, कॅनलच्या बाजुने सिमेंट काँक्रीटची भिंत व बहुउद्देशीय हॉलचा समावेश होता. परंतु मंत्रालयातून क्रीडा खात्याकडे निधी वळता न करण्यात आल्याने क्रीडा संकुलाचे काम पुन्हा रखडले. त्यामुळे वर्षभर अधिकाºयांनी केलेल्या पाठपुराव्यासाठीची मेहनत वाया गेली असल्याचे दिसून येत आहे.
मंत्रालयात पाठपुरावा करून जोर लावण्याची गरज
प्रस्ताव सादर केला तरी जोपर्यंत लोकप्रतिनिधींकडून सातत्याने पाठपुरावा होत नाही तोपर्यंत मंत्रालयात संबंधित कामांसाठी निधी मंजूर होत नाही, हा आजपर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींनी या क्रीडा संकुलासाठी आवश्यक असलेला निधी मंजूर करावा, यासाठी पाठपुरावा करण्याची गरज आहे. पाठपुरावा न झाल्यास सदर क्रीडा संकूल आणखी काही वर्ष रखडण्याची शक्यता नाकारता येत नाही. आमदार डॉ.देवराव होळी त्यासाठी प्रयत्नशिल आहेत.

Web Title: The Sports Complex

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sportsक्रीडा