परीक्षेच्या काळात क्रीडा महोत्सव
By admin | Published: November 22, 2014 11:01 PM2014-11-22T23:01:03+5:302014-11-22T23:01:03+5:30
स्थानिक गोंडवाना विद्यापीठांतर्गत २४ नोव्हेंबर २०१४ पासून बीए भाग १, बीएस्सी भाग १ तसेच अन्य अभ्यासक्रमांच्या पहिले, तिसरे, पाचवे सेमिस्टर २०१४ ची हिवाळी परीक्षा होणार आहे.
खेळाडू विद्यार्थ्यांची अडचण : नियोजन व समन्वयाचा अभाव
गडचिरोली : स्थानिक गोंडवाना विद्यापीठांतर्गत २४ नोव्हेंबर २०१४ पासून बीए भाग १, बीएस्सी भाग १ तसेच अन्य अभ्यासक्रमांच्या पहिले, तिसरे, पाचवे सेमिस्टर २०१४ ची हिवाळी परीक्षा होणार आहे. तर १८ व्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ अश्वमेध क्रीडा महोत्सवाचे आयोजन २७ नोव्हेंबर ते १ डिसेंबर दरम्यान करण्यात आले आहे. ऐन परीक्षेच्या कालावधीत अश्वमेध क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याने खेळाडू विद्यार्थ्यांपुढे मोठी अडचण निर्माण झाली असून यात नियोजन व समन्वयाचा अभाव असल्याचे दिसून येते.
गोंडवाना विद्यापीठांतर्गत हिवाळी २०१४ च्या सेमिस्टर परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार २४ नोव्हेंबर २०१४ पासून तर २४ डिसेंबर २०१४ पर्यंत बीए भाग १, बीएस्सी भाग १ अभ्यासक्रमाची पहिल्या सत्रांची हिवाळी परीक्षा होणार आहे. या कालावधीत विद्यार्थ्यांचे ८ पेपर होणार आहेत. बीएस्सी भाग २ च्या तृतीय सत्राची परीक्षा ४ ते २० डिसेंबर २०१४ दरम्यान आहे. तसेच इतरही अभ्यासक्रमाचे पहिले, तिसरे व पाचव्या सत्रांची हिवाळी परीक्षा घेण्यात येणार आहे. राज्य शासनाच्यावतीने अश्वमेध क्रीडा महोत्सवाचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. यंदा सदर क्रीडा महोत्सव २७ नोव्हेंबर ते १ डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. अश्वमेध क्रीडा महोत्सवामध्ये राज्यातील २० विद्यापीठांतर्गत असलेल्या अनेक महाविद्यालयाचे मुले व मुली खेळाडू म्हणून सहभागी होणार आहेत. या क्रीडा महोत्सवात खेळाडुंना सहभागी करून घेण्याबाबत गोंडवाना विद्यापीठ प्रशासनाला क्रीडा महोत्सव आयोजक समितीच्यावतीने पत्र पाठविण्यात आले. त्यानुसार गोंडवाना विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाने विविध प्रकारच्या खेळांसाठी ११८ महाविद्यालयातील तब्बल १२० विद्यार्थ्यांची निवड केली आहे. अश्वमेध क्रीडा महोत्सवात गोंडवाना विद्यापीठातर्फे मुलामुलींचे बॉस्केटबॉल, व्हॉलीबॉल, खो-खो, कबड्डी, मैदानी स्पर्धा व तलवारबाजी या खेळांच्या संघामध्ये १२० खेळाडुंची निवड करण्यात आली आहे.
गोंडवाना विद्यापीठाच्या निवड करण्यात आलेल्या सर्व संघातील खेळाडू विद्यार्थ्यांना औरंगाबाद येथील अश्वमेध क्रीडा महोत्सवासाठी गडचिरोली येथून २५ नोव्हेंबरला खेळाडू रवाना होणार आहेत. या अश्वमेध क्रीडा महोत्सवाचा समारोप १ डिसेंबरला होणार आहे. या क्रीडा महोत्सवातील सहभागी खेळाडू २ डिसेंबरला गडचिरोलीत पोहोचणार असल्याची माहिती आहे. अनेक हुशार विद्यार्थ्यांची अश्वमेध क्रीडा महोत्सवातील संघामध्ये निवड करण्यात आली आहे. अश्वमेध क्रीडा महोत्सव व हिवाळी परीक्षा एकाच कालावधीत आल्याने अनेक विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली आहे. गोंडवाना विद्यापीठांतर्गत अनेक महाविद्यालयाच्यावतीने अश्वमेध क्रीडा महोत्सवाची तयारी सुरू करण्यात आली असून २० नोव्हेंबरपासून खेळांचा सराव व प्रशिक्षण घेण्यात येत आहे. तोंडावर हिवाळी परीक्षा आल्या असतानाही अश्वमेध क्रीडा महोत्सवाचे पडघम वाजल्याने अनेक विद्यार्थी खेळाचा सराव करीत आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)