खेळांनी आव्हाने पेलण्याचे धैर्य येते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 11:08 PM2019-01-31T23:08:30+5:302019-01-31T23:09:01+5:30
जीवनात बऱ्याच मोठ्या आव्हानांचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागतो. खेळाच्या माध्यमातून विद्यार्थी कठीण प्रसंगांचा सामना धैर्याने कसा करावा, याचे नैतिक बळ मिळते. गडचिरोली जिल्ह्याने खेळांचे यशस्वी आयोजन केले आहे. ही अतिशय आनंदाची बाब असल्याचे प्रतिपादन भारत सरकारच्या आदिवासी कल्याण मंत्रालयाचे सचिव दीपक खांडेकर यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जीवनात बऱ्याच मोठ्या आव्हानांचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागतो. खेळाच्या माध्यमातून विद्यार्थी कठीण प्रसंगांचा सामना धैर्याने कसा करावा, याचे नैतिक बळ मिळते. गडचिरोली जिल्ह्याने खेळांचे यशस्वी आयोजन केले आहे. ही अतिशय आनंदाची बाब असल्याचे प्रतिपादन भारत सरकारच्या आदिवासी कल्याण मंत्रालयाचे सचिव दीपक खांडेकर यांनी केले.
आदिवासी विकास विभागाचे राज्यस्तरीय क्रीडा संमेलन गडचिरोली येथे पार पडले. या क्रीडा स्पर्धाचा समारोप व बक्षीस वितरण सोहळा ३१ जानेवारी रोजी जिल्हा प्रेक्षागार मैदानावर सायंकाळी ५ वाजता पार पडला. भारत सरकार आदिवासी कल्याण मंत्रालयाचे सचिव दीपक खांडेकर व उपस्थित मान्यवरांच्या विजेत्या खेळाडूंना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी खांडेकर मार्गदर्शन करीत होते. नागपूर विभाग सर्वाधिक ४२८ गुण घेऊन विजेता तर नाशिक विभाग ३७६ गुण घेऊन उपविजेता ठरला.
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा होत्या. प्रमुख अतिथी म्हणून आमदार डॉ. देवराव होळी, नाशिकचे अपर आयुक्त गिरीश सरोदे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या क्रीडा संचालिका डॉ.अनिता लोखंडे, आदिवासी विकास विभागाचे उपसचिव सु. ना. शिंदे, उपसचिव लक्ष्मीकांत ढोके, अनुसुचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीचे उपायुक्त विनोद पाटील, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा गडचिरोचे प्रकल्प अधिकारी डॉ.सचिन ओम्बासे, सहायक जिल्हाधिकारी तथा अहेरीच्या प्रकल्प अधिकारी इंदुराणी जाखड, चिमूरचे प्रकल्प अधिकारी केशव बावनकर, भामरागडचे प्रकल्प अधिकारी निरज मोरे, सहायक प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, जिल्हा क्रीडाधिकारी चंद्रादीप शिंदे उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ. होळी म्हणाले की, मी पण शासकीय आश्रमशाळेत शिक्षण घेवून वैद्यकीय अधिकारी व आमदार झालो. खेळाडूने खेळाडूवृत्तीने खेळावे. आश्रमशाळा व वसतिगृहाच्या सुधारणेकडे शासनाचे विशेष लक्ष असून आदिवासी विकास विभागाचे मंत्री व अधिकारी योग्य दिशेने कार्य करत आहेत. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी खेळासोबत शिक्षणाकडे विशेष लक्ष द्यावे.
अध्यक्षीय भाषणात मनिषा वर्मा म्हणाल्या, विभागातील खेळाडूंचे क्रीडा कौशल्य सोबतच सांस्कृतिक गुण पाहून मी आनंदीत झाली. आदिवासी विकास नागपूर विभागातील अधिकारी व कर्मचाºयांनी अथक परिश्रमाने हे क्रीडा संमेलन यशस्वी करून दाखविले व डॉ. सचिन ओंबासे यांनी उत्कृष्टपणे नियोजन केले. समारोपीय कार्यक्रमाचे अहवाल वाचन चिमूरचे प्रकल्प अधिकारी केशव बावणकर यांनी केले. संचालन जवाहर गाढवे व अनिल सोमनकर यांनी केले. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा गडचिरोचे प्रकल्प अधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी प्रसिद्धी प्रमुख सुधीर शेंडे, विभागीय क्रीडा समन्वयक संदीप दोनाडकर किशोर तुमसरे, प्रवीण तुरानकर, सुभाष लांडे, मुकेश गेडाम, प्रमिला दहागावकर,मंगेश ब्राह्मणकर, सतिश पवार, सुधीर झंजाळ, व्यंकटेश चाचरकर, अनिल बारसागडे, विनोद चलाख, अश्विन सारवे, आशिष नंदनवार, रामचंद्र टेकाम, विनायक क्षीरसागर व नागपूर विभागातील संबंधित अधिकारी व कर्मचाºयांनी परिश्रम घेतले.
माऊंट एव्हरेस्ट सर करणारेही झाले सहभागी
या क्रीडा संमेलनात राज्यातील नाशिक, नागपूर, अमरावती व ठाणे या चार विभागातील १ हजार ७५७ खेळाडूंनी सहभाग घेतला. १४, १७ व १९ वर्षे वयोगटात कबड्डी, खोखो, व्हॉलीबॉल, हॅण्डबॉल या सांघिक तसेच लांब उडी, उंच उडी, गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक, धावणे आदी वैयक्तिक खेळातून विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य सीद्ध केले. विजेता संघाला चषक देऊन गौरविण्यात आले.
मागील वर्षी मिशन शौर्य-१ अंतर्गत माउंट एवरेस्ट सर करणाºया चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. देवाडा आश्रमशाळेतील मनीषा धुर्वे, प्रमेश आळे, उमाकांत मडावी व जिवती आश्रमशाळेतील कविदास काठमोडे व विकास सोयाम या पाच विद्यार्थ्यांनी माउंट एव्हरेस्ट सर केले होते. तसेच मिशन शौर्य-२ अंतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा सुध्दा सत्कार झाला.