धानावर तत्काळ फवारणी करा
By admin | Published: October 19, 2016 02:31 AM2016-10-19T02:31:52+5:302016-10-19T02:31:52+5:30
धान पिकावर तुडतुडा, करपा रोगाबरोबरच बेरड (सुरळीतील अळी) रोगाचाही प्रादुर्भाव झाला आहे.
गडचिरोली : धान पिकावर तुडतुडा, करपा रोगाबरोबरच बेरड (सुरळीतील अळी) रोगाचाही प्रादुर्भाव झाला आहे. या रोगांना आटोक्यात आणण्यासाठी शेतकऱ्यांनी तत्काळ किटकनाशकांची फवारणी करावी, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.
धान पिकावर प्रामुख्याने धान पिकावर पाने गुंडाळणारी अळी, बेरड, तुडतुडे या किडींचा तर करपा व कडाकरपा या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. चामोर्शी, मुलचेरा, धानोरा, कोरची, गडचिरोली तालुक्याचे सर्वेक्षण केले असता, या धान पिकावर तुडतुडा या किडीचा सर्वाधिक प्रादुर्भाव असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कीड व रोगाच्या व्यवस्थापनाकरिता वेळीच उपाययोजना करावी, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. विलास तांबे, डॉ. सुधीर बोरकर, विषय विशेषतज्ज्ञ पुष्पक बोथीकर यांनी केले आहे.
उशिरा येणाऱ्या धानाच्या बेरडचा प्रादुर्भाव अधिक दिसून आला आहे. त्याच्या नियंत्रणासाठी मॅलॉथिआॅन ५० टक्के प्रवाही (३०) मिली किंवा कार्बारील (पा. मि. भुकटी) २० ग्रॅम प्रति १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, तपकिरी तुडतुडी आणि पांढऱ्या पाठीचे तुडतुडे या रसशोषण करणाऱ्या किडीची संख्या १० ते १५ प्रति चुड दिसून आली आहे. या किडीच्या नियंत्रणासाठी फ्रिप्रोनिल ५ एस. सी. (२० मि.ली) किंवा थॉयोमेथाक्झाम २५ डब्ल्यूजी (२ गॅ्रम) किंवा फेन्योएट ५० टक्के प्रवाही (१० मि. ली) किंवा ट्रयझोफॉस ४० ई. सी. (२० मि. ली.) यापैकी कोणत्याही एका किटकनाशकाची १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, अथवा मेटाराझीयम अॅनीसोपली या जैविक बुरशीनाशकाची २.५० किलो प्रति हेक्टरी प्रमाणे वापर करावा. सोबतच पेरावरील करपा, मानेवरील करपा आणि कडाकरपा रोगाचा प्रादुर्भाव असल्याचा आढळल्यास कार्बन्डाझीम १० ग्रॅम किंवा आॅपर आॅक्झीक्लोराईड २५ ग्रॅम व स्ट्रेप्टोसायक्लीन ०.५ ग्रॅम या बुरशी व जीवाणूनाशकाची १० लिटर पाण्यात मिसळून फवाणी करावी, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्रातर्फे करण्यात आले आहे. (नगर प्रतिनिधी)