स्नेहनगरात जंतुनाशक फवारणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:23 AM2021-07-19T04:23:34+5:302021-07-19T04:23:34+5:30

गडचिरोली : डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने येथे फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. अनेक दिवसांपासून या वाॅर्डात फवारणी करण्यात ...

Spray disinfectant in Sneha Nagar | स्नेहनगरात जंतुनाशक फवारणी करा

स्नेहनगरात जंतुनाशक फवारणी करा

Next

गडचिरोली : डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने येथे फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. अनेक दिवसांपासून या वाॅर्डात फवारणी करण्यात आली नाही.

प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर बंदी घालावी

एटापल्ली : मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे यावर आळा घालणे गरजेचे आहे. वाहनांद्वारे प्रदूषणात वाढ होत असून, कारवाईची मागणी आहे.

आरोग्य सेविका अल्प

गडचिरोली : ४५ प्राथमिक आरोग्य केंद्र, ३६ आरोग्य पथक व ३७६ उपकेंद्र आहेत. या सर्व ठिकाणी अत्यंत महत्त्वाची आरोग्य सेवा देण्याचे काम परिचारिका करतात. मात्र जिल्ह्यातील लोकसंख्येच्या तुलनेत परिचारिका कमी आहेत.

डुकरांचा बंदोबस्त करा

चामोर्शी : शहरात मागील काही दिवसांपासून मोकाट डुकरांची संख्या भरपूर प्रमाणात वाढली आहे. कचरा तसेच सांडपाण्याच्या डबक्यांमध्ये मोकाट डुकरे बसून असतात. त्यामुळे परिसरात रोगराई पसरण्याची शक्यता आहे.

रस्त्यावर कचराच

देसाईगंज : घंटागाडी वॉर्डात फिरत असतानाही या घंटागाडीत कचरा टाकत नाहीत. उलट काही लोक तलावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर कचरा टाकतात. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आहे. प्रशासन डाेळेझाक करीत आहे.

साईन बोर्ड नादुरुस्त

कुरखेडा : मुख्य मार्गावर बऱ्याच ठिकाणी शहरातील स्थानाबाबत साईन बोर्ड लावण्यात आले आहेत. मात्र ते अनेक ठिकाणी तुटले आहेत. त्याची दुरुस्ती करावी. फलकांवरील गावाचे नाव लिहिले असल्याने समजण्यास अडचण जाते.

तलाव सौंदर्यीकरण नाही

चामोर्शी : तलावाचे सौंदर्यीकरण करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. चामोर्शी शहरात फिरण्यासाठी व निवांत बसण्यासाठी प्रशस्त जागा नाही, त्यामुळे शहरातील तलावाचे सौंदर्यीकरण करावे.

रामगड परिसरात फवारणी करा

कुरखेडा : रामगड- पुराडा भागात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. या भागात तत्काळ डास प्रतिबंधक औषधांची फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. यंदाच्या पावसाळ्यातही फवारणी करण्यात आली नाही. त्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागले. नियमित फवारणीकरिता वरिष्ठांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

शेतकरी विविध योजनांबद्दल अनभिज्ञ

देसाईगंज : कृषी, महसूल व वनविभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विविध योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. मात्र जिल्ह्यातील संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी दुर्गम व नक्षलग्रस्त भागातील गावांमध्ये पोहोचत नसल्याने या भागातील अनेक शेतकऱ्यांना योजनांची माहिती नाही.

कोडसेपल्लीतील समस्या सोडविण्याची मागणी

अहेरी : परिसरातील दुर्गम भागात वसलेल्या कोडसेपल्ली येथे अनेक समस्यांची भरमार आहे. गावात नाल्यांचा अभाव असल्याने पाण्याचा निचरा होण्यास अडचण जात आहे. परिणामी जागोजागी सांडपाणी साचून दुर्गंधी पसरली आहे.

ग्रामीण भागात वीज चोरीचे प्रमाण वाढले

मुलचेरा : महावितरणचे बहुतांश कर्मचारी घरूनच कारभार हाकत असल्याने दुर्गम व ग्रामीण भागात विजेची चोरी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. याचा फटका महावितरणला बसत आहे. त्यामुळे महावितरणने लक्ष देण्याची मागणी सुज्ञ ग्राहकांकडून होत आहे. मुलचेरा तालुक्याच्या ग्रामीण भागात वीजचोरीचे प्रमाण अधिक आहे.

टिपागड परिसराला अभयारण्याचा दर्जा द्या

कुरखेडा : तालुक्यातील टिपागड अभयारण्याच्या निर्मितीच्या हालचाली मंदावल्याचे दिसून येत आहे. या अभयारण्यातील गावांचे पुनर्वसन तीव्र गतीने करण्याची गरज आहे. शिवाय येथील वन्यजीवांच्या संरक्षणासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

दुग्ध संस्थांना आर्थिक मदतीची मागणी

गडचिरोली : अपुऱ्या दूध पुरवठ्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील सुमारे ६२ दुग्ध सहकारी संस्था बंद पडल्या आहेत. दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी दूध उत्पादन शेतकऱ्यांना आर्थिक मदत व मार्गदर्शनाची गरज आहे. मात्र शासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यात दूध उत्पादनाला बराच वाव असल्याने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

स्नेहनगरात जंतुनाशक फवारणी करा

गडचिरोली : शहरातील स्नेहनगरात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने येथे फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मागील अनेक दिवसांपासून या वाॅर्डात फवारणी करण्यात आली नाही. त्यामुळे येथे डासांची उत्पत्ती वाढली आहे. कोरोना व इतर रोगाचा संसर्ग होऊ नये, यासाठी पालिका व आरोग्य प्रशासनाने नाल्यांमध्ये जंतुनाशक फवारणी करावी, अशी मागणी होत आहे.

कमी रेंजमुळे भ्रमणध्वनीधारक त्रस्त

आष्टी : जयरामपूर परिसरातील भ्रमणध्वनी सेवा मागील अनेक दिवसांपासून विस्कळीत होत असल्याने या भागातील विविध कंपन्यांच्या भ्रमणध्वनीधारकांची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे भ्रमणध्वनी मनोऱ्यांची रेंज वाढवावी, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.

रुग्णवाहिकांची संख्या वाढवा

गडचिरोली : गाव पातळीवरील रुग्णांना अतिमहत्त्वाच्या उपचारासाठी खासगी वाहनाने शहरातील रुग्णालयात जावे लागते. अनेकदा वाहनेही वेळेवर उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे रुग्णांना आपल्या प्राणाला मुकावे लागते.

कचरा व्यवस्थापन प्रकल्प निर्माण करा

आरमोरी : ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात कचरा व्यवस्थापनाचे काम रखडलेले आहे. त्यामुळे अनेक गावांच्या बाहेर कचऱ्याचे ढीग नेऊन टाकले जातात व या कचऱ्यावर जनावरे पसरून राहतात.

घरमालकांना नव्या भाडेकरूंची प्रतीक्षा

गडचिराेली : कोरोना संचारबंदीच्या कालावधीत गडचिराेली शहरासह जिल्ह्याच्या शहरी भागात भाड्याने राहणारे ग्रामीण भागातील अनेक कुटुंबे व विद्यार्थी स्वगावी परतले. तेव्हापासून बऱ्याच घरमालकांच्या खोल्या रिकाम्या आहेत. या घरमालकांना नव्या भाडेकरूंची प्रतीक्षा आहे.

जेनेरिक औषधसाठा वाढविण्याची मागणी

गडचिराेली : पंतप्रधान जनआरोग्य औषधी केंद्रामध्ये शासनाच्या सवलतीत औषधसाठा वितरित करण्यात येतो. मात्र, काही केंद्रात अत्यल्प प्रकारचा औषधसाठा उपलब्ध आहे. परिणामी अतिरिक्त पैसे देऊन रुग्णांना औषधांची खरेदी करावी लागत आहे. औषधसाठा वाढवण्याची मागणी आहे.

विशेष घटक योजनेतून वीज जोडणी करावी

आरमाेरी : परिसरातील अनेक गावांमधील काही वॉर्डांमध्ये अद्याप विद्युत पुरवठा झाला नाही. या वॉर्डांमध्ये प्रामुख्याने वंचित घटकांतील नागरिक राहतात. त्यामुळे वीज जोडणीपासून वंचित असलेल्या अनुसूचित जातीमधील कुटुंबीयांनी विशेष घटक योजनेअंतर्गत वीजपुरवठा करावा, अशी मागणी वीज कंपनीकडे केली आहे.

केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ द्यावा

काेरची : पंतप्रधान जनधन योजना, प्रधानमंत्री विमा सुरक्षा योजना, अटल पेन्शन योजना, पीकविमा योजना, प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना, समृद्धी सुकन्या योजना, उज्ज्वला गॅस योजना आदी योजना राबविल्या जात आहेत. मात्र अनेकांना या योजनांची माहिती नसल्याने गरीब लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ मिळत नाही. त्यामुळे प्रशासनाने अधिकाधिक जनजागृती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

पशुपालन योजनांची जनजागृती करा

भामरागड : पशुसंवर्धन विभागाच्यावतीने पशुपालकांसाठी विविध योजना राबविल्या जातात. मात्र बहुतांश पशुपालकांना या योजनांची माहिती नसल्याने ते या योजनांचा लाभ घेऊ शकत नाही. पशुसंवर्धन विभागाने या योजनांची व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याची गरज आहे. पशुपालन हा शेतीला चांगला जोडधंदा आहे. त्यामुळे या योजनांची जनजागृती करावी.

बांधकाम मजूर नोंदणीपासून वंचित

कुरखेडा : बांधकाम कामगारांची नोंदणी ग्रामपंचायतस्तरावर करण्याचे निर्देश शासनाने दिले असले, तरी या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याचे दिसून येत नाही. ग्रा.पं. प्रशासनाच्या जनजागृतीअभावी ग्रामीण व दुर्गम भागातील बांधकाम मजूर नोंदणीपासून वंचित असल्याचे दिसून येते. परिणामी त्यांना शासन योजनांच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे.

मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमण हटवा

गडचिरोली : गडचिरोली शहरातील मुख्य बाजारपेठ त्रिमूर्ती चौकातून आठवडी बाजाराकडे जाणाऱ्या मार्गावर आहे. सणासुदीच्या कालावधीत व आठवडी बाजाराच्यादिवशी रविवारी या मार्गावर वाहनधारकांची प्रचंड गर्दी असते. अनेकदा वाहतुकीची कोंडी होते. अतिक्रमणाची समस्या गंभीर झाली असून, अतिक्रमण हटविण्याची मागणी आहे.

लाहेरीत नवीन आराेग्य केंद्र बांधा

भामरागड : लाहेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार पुरेशा इमारतीअभावी एकाच खोलीतून सुरू आहे. या आरोग्य केंद्रात परिसरातील अनेक रुग्ण औषधोपचारासाठी दररोज येतात. या आरोग्य केंद्राच्या नव्या इमारतीचे काम सुरू करावे.

मद्यपी वाहनचालकांवर कारवाई थंडबस्त्यात

गडचिरोली : तालुक्यात अनेक दुचाकी तसेच चारचाकी वाहनधारक दारू प्राशन करून वाहन चालवितात. याकडे वाहतूक तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचे दुर्लक्ष होत आहे. अपघातांचे प्रमाण वाढले आहे. सातत्याने मागणी करूनही मद्यपी वाहनचालकांवर कारवाई होत नाही.

Web Title: Spray disinfectant in Sneha Nagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.